Maharashtra Election 2019: सावंतवाडीत बंडखोर गणित बिघडवणार की केसरकर विजयाची हॅट्ट्रिक साधणार?

By बाळकृष्ण परब | Published: October 4, 2019 08:10 AM2019-10-04T08:10:41+5:302019-10-04T08:29:48+5:30

स्वपक्षीय तसेच मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याने केसरकर यांचे टेन्शन वाढले

Maharashtra Election 2019 challenge of rebellion in front of shiv senas deepak kesarkar in sawantwadi constituency | Maharashtra Election 2019: सावंतवाडीत बंडखोर गणित बिघडवणार की केसरकर विजयाची हॅट्ट्रिक साधणार?

Maharashtra Election 2019: सावंतवाडीत बंडखोर गणित बिघडवणार की केसरकर विजयाची हॅट्ट्रिक साधणार?

googlenewsNext

- बाळकृष्ण परब 

विधानसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यावेळी युती आणि आघाडी झाल्याने अनेक ठिकाणी थेट लढती होत आहेत. मात्र काही मतदारसंघात स्वपक्षीय आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याने लढती रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारमध्ये गृह आणि अर्थराज्य मंत्रिपद सांभाळत असलेले शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. स्वपक्षीय तसेच मित्रपक्ष असलेल्या भाजपाच्या नेत्यांनी  बंडखोरी केल्याने केसरकर यांचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे सावंतवाडीत बंडखोर गणित बिघडवणार की केसरकर विजयाची हॅट्ट्रिक साधणार? याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.
 
यापूर्वी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व करणारे दीपक केसरकर यावेळी विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र निवडणूक जाहीर होताच केसरकरांचे एकेकाळचे सहकारी आणि सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यासाठी साळगावकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या तिकिटावरून मैदानात उतरत केसरकर यांना आव्हान दिले आहे. तर शिवसेनेचे दोडामार्ग तालुक्यातील नेते प्रकाश रेडकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या इंजिनात स्वार होत आव्हान उभे केले आहे. या स्वपक्षीय बंडखोरांसोबत केसरकरांसमोर मोठे आव्हान असणार आहे ते भाजपा नेते राजन तेली यांचे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात युती झाली असली तरी तेली यांनी केसरकरांविरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक केसरकरांसाठी जड जाईल, अशी चर्चा सुरू आहे. 

केसरकरांना आव्हान देणाऱ्या या तिन्ही उमेदवारांच्या बलाबलाच आढावा घेतला असता काही धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित असली तरी राष्ट्रवादीकडून मैदानात उतरलेले बबन साळगावकर यांचा सावंतवाडी शहरात बऱ्यापैकी जनाधार आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राणे समर्थक स्वाभिमान पक्षाने सावंतवाडी नगरपालिकेत जोरदार मुसंडी मारली होती. मात्र बबन साळगावकर यांनी थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्या यश मिळवले होते. गेल्या दोन निवडणुकांतील मतदानाचा कल पाहिल्यास सावंतवाडी शहरात केसरकर यांना भरभरून मतदान झाले होते. मात्र यावेळी बबन साळगावकर यांच्या रूपात सावंतवाडीतील उमेदवार समोर असल्याने मतांची मोठ्या प्रमाणात फाटाफूट होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका साहजिकच केसरकर यांना बसेल.

त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे दोडामार्गमधील नेते प्रकाश रेडकर यांनी मनसेमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. मतदारसंघात मनसेचा जनाधार तसा कमीच आहे. मात्र दोडामार्ग भागात त्यांना चांगले मतदान होऊ शकते. त्यामुळे रेडकर यांच्या उमेदवारीमुळे केसरकर यांना मिळणारी काही मते निश्चितच कमी होतील. 

यंदाच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते राजन तेली यांचे. तेली यांनी अखेरच्या क्षणी माघार न घेतल्यास सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली अशीच थेट लढत होण्याची शक्यता आहे. केसरकर यांच्या मागे शिवसेनेचे भक्कम संघटन आहे. तर युती झाली असली तरी मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजन तेलींच्या मागे उभे राहतील अशी चिन्हे आहेत. त्याबरोबरच नितेश राणेंच्या भाजपाप्रवेशामुळे येथील स्वाभिमानच्या कार्यकर्त्याचे उघड पाठबळही तेली यांना मिळेल. तसेच दीपक केसरकर यांचा वचपा काढण्यासाठी नारायण राणेही इच्छुक असतील. त्यासाठी केसरकर यांच्याविरोधात असलेल्या प्रबळ उमेदवाराला ते निश्चितपणे बळ देतील. त्यामुळे तेलींचे आव्हान परतवून लावताना दीपक केसरकर यांची दमछाक होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे केसरकरांचा विचार केल्यास त्यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत भावनिक मुद्दा पुढे आणला आहे. त्यातच गेल्या दोनवेळपेक्षा यावेळी त्यांच्यासमोरील आव्हान कठीण आहे. त्यातच दहा वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्याने त्यांना अँटीइन्कम्बन्सीचा सामनाही करावा लागत आहे. गेली पाच वर्षे मंत्रिपद सांभाळताना त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.  मात्र मतदारसंघातील अनेक प्रश्न अजून कायम आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्याविरोधात नाराजीही आहे. मात्र असे असले तरी या मतदारसंघात शिवसेनेची संघटना भक्कम असल्याने त्याचा फायदा निश्चितच केसरकर यांना होईल. त्यातच विरोधात तीन उमेदवार उभे ठाकल्याने केसरकर यांच्याविरोधातील मतांच साहजिकच विभाजन होऊन त्याचा फायदा निश्चितपणे केसरकर यांना होऊ शकतो. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास केसरकर हे अनुक्रमे 18 हजार आणि 41 हजार मतांनी विजयी झाल्याचे दिसून येते. 2014 मध्ये त्यांना तब्बल 70 हजार इतके मतदान झाले होते. मात्र यावेळची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे विरोधकांचे आव्हान परतवताना त्यांचा कस लागणार आहे. या सर्व परिस्थितीवर मात करत ते विजयी झाले तरी त्यांचे मताधिक्य मात्र फार कमी झालेले असेल.

Web Title: Maharashtra Election 2019 challenge of rebellion in front of shiv senas deepak kesarkar in sawantwadi constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.