चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार उद्या राज्यपालांना भेटणार; म्हणाले, महायुतीचंच सरकार येणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 05:16 PM2019-11-06T17:16:24+5:302019-11-06T17:48:51+5:30
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीचेच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीचेच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच सरकार स्थापनेबाबत माहिती देण्यासाठी आपण आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांना भेटण्यासाठी गुरुवारी जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्यात उदभवलेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमितीची बैठक आज पुन्हा एकदा झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,''विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेना, भजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीला जनादेश मिळाला आहे. या जनादेशाचा आदर व्हावा ही भाजपाची पहिल्यापासूनची भूमिका आहे. राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन व्हावं, यासाठी भाजपाचं पुढील प्रत्येक पाऊल पडेल. तसेच कुणीही कितीही प्रयत्न केले तरी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होईल.''
तसेच सरकार स्थापनेबाबत माहिती देण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात नवे सरकार स्थापन करण्याविषयीच्या तयारीची माहिती देण्यासाठी मी आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या राज्यापालांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत,''असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड ३१ डिसेंबरपूर्वी करण्यात येणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. तसेच नवे जिल्हाप्रमुख आणि बुथप्रमुख निवडले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.