महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुख्यमंत्र्यांचा दावा खरा ठरला; शिवसेनेचा 'या' दोन मतदारसंघात केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 05:30 PM2019-10-24T17:30:48+5:302019-10-24T17:31:29+5:30
राज्यात कणकवली आणि माण मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांविरोधात शिवसेनेने उमेदवार उभे केले होते.
मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झालेले आहेत. राज्यात महायुतीला पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळणार आहे. पण महाआघाडीने दिलेल्या कडव्या लढतीत काँग्रेसने ४५ तर राष्ट्रवादीने ५३ जागांवर आघाडी मिळविली आहे. मात्र राज्यातील दोन मतदारसंघात शिवसेनेने भाजपाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवार उभे केले होते.
राज्यात कणकवली आणि माण मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांविरोधात शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. कणकवलीतून भाजपाचे नितेश राणे तर शिवसेनेचे सतीश सावंत यांच्यात लढत झाली तर माणमध्ये जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्यात लढत झाली. या दोन्ही मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेऊन अधिकृत उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र या दोन्ही जागा आम्हीच जिंकणार असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.
विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये माणमधून भाजपाचे जयकुमार गोरे आणि कणकवलीतून नितेश राणे यांनाच जनतेने पुन्हा कौल दिला आहे. विधानसभेत भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन युतीत निवडणूक लढविली होती. भाजपाने १६४ जागा तर शिवसेनेने १२४ जागांवर निवडणूक लढविली होती. मात्र शिवसेनेने २ जागी भाजपाविरोधात उमेदवार उभे केले होते. मात्र या दोन्ही जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे.