Maharashtra Election 2019: 'वयानं लहान असलो, तरी आखाड्यातले वस्ताद आहोत'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 09:27 PM2019-10-18T21:27:27+5:302019-10-18T21:29:06+5:30
कुस्तीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा पवारांना टोला
मुंबई: गेल्या ५ वर्षात प्रत्येक निवडणुकीत पराभूत झाल्यावर आता काही जणांना आम्ही लहान वाटू लागलो आहोत. त्यामुळे आता लहान मुलांशी लढत नाही, असं ते म्हणू लागलेत. मात्र आम्ही वयानं, अनुभवानं लहान असलो, तरीही आखाड्यातले वस्ताद आहोत, हे आता त्यांना समजलंय, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला. ते मुंबईतील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
राष्ट्रवादी आणि शरद पवारांची अवस्था आता शोलेतील जेलरसारखी आहे. आधे इधर जाओ.. आधे उधर जाओ.. बाकी मेरे पीछे आओ.. त्यांच्या पक्षात आता नेतेच उरलेले नाहीत. राष्ट्रवादी हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे. त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. अनेकदा अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या मागितल्या जातात. मात्र राष्ट्रवादी अनुकंपा तत्त्वावर मतं मागतेय. आमच्यावर ईडीची कारवाई होतेय. आम्हाला मतं द्या असं म्हणण्याची वेळ पवारांवर आली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पवारांवर बरसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली आणि केंद्र सरकारच्या मदतीमुळे गेल्या ५ वर्षात मुंबईत अनेक प्रकल्पांची पायाभरणी झाली. शहरात सध्या मेट्रोचं जाळ उभारलं जातंय. कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांमुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्यामुळे येत्या २ ते ३ वर्षांमध्ये मुंबई देशातलं क्रमांक एकचं शहर होईल, असं फडणवीस म्हणाले. गेल्या ५ वर्षांमध्ये महायुतीनं पारदर्शक कारभार केला आहे. गुंतवणुकीत, उद्योगात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान मोदी नवा भारत घडवत आहेत. आपण नवा महाराष्ट्र घडवू. त्यासाठी महायुतीला भरभरुन मतदान करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं.