मनं अन् मतं जिंकणाऱ्या शरद पवारांच्या भर पावसातील सभेवरून देवेंद्र फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:49 PM2019-10-30T12:49:21+5:302019-10-30T13:03:57+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आणि पवारांनी मनं अन् राष्ट्रवादीने मतं जिंकली, असं म्हटलं जातं.
मुंबईः महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, भाजपा-शिवसेना महायुतीने बहुमत मिळवलं असलं, तरी सर्वात जास्त चर्चा आहे ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीच. वयाच्या ७९व्या वर्षी राज्यभर फिरून त्यांनी केलेला झंझावाती प्रचार आणि साताऱ्यात भर पावसात घेतलेली 'वादळी सभा' देशभरात डोक्यावर घेतली जातेय. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना अप्रत्यक्षपणे टोला मारला.
शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आणि पवारांनी मनं अन् राष्ट्रवादीने मतं जिंकली, असं म्हटलं जातं. तोच धागा पकडत, 'पावसात भिजावे लागते हा आमचा अनुभव कमी पडला', अशी मार्मिक टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली. 'वर्षा' निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राजकारणावरील बऱ्याच प्रश्नांना उत्तरं दिली. कुणी 'मॅन ऑफ द मॅच' म्हणू देत, कुणी 'मॅन ऑफ द सीरीज' म्हणू देत, पण सरकार कुणाचं स्थापन होतं हे महत्त्वाचं असतं, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
राष्ट्रवादीचा भाजपावर 'बाण'; महायुतीमधील सुंदोपसुंदीवर चित्रातून निशाणा
दबावाचं राजकारण सुरूच; भाजपाला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आखाड्यात फडणवीस आणि पवारांमध्ये कुस्तीवरून बरीच शाब्दिक चकमक रंगली होती. आमचे पैलवान तेल लावून आखाड्यात उतरले आहेत. मात्र समोर कोणी पैलवानच दिसत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला होता. तेव्हा, मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष असल्याचं प्रत्युत्तर पवारांनी दिलं होतं. अखेर, या स्पर्धेत कुठला पैलवान जिंकला, असं विचारताच, त्यांचे ५४ आलेत आणि माझे १०५ आलेत, याकडे मुख्यमंत्र्यांनी विजयी आविर्भावात लक्ष वेधलं.
'यामुळे' शेतकऱ्यांना हवंय शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार!
जितेंद्र आव्हाडांचा भाजपा, शिवसेनेला सल्ला; मुख्यमंत्रिपदासाठी भन्नाट फॉर्म्युला
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद नाहीच!
आम्ही शिवसेनेसोबतच सरकार स्थापन करू, असं ठामपणे सांगतानाच, मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलाही समझौता होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं. अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं दिला होता, पण त्यावर कुठलाही निर्णय झाला नव्हता, असं सांगून त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेला सत्तावाटपात फार तर उपमुख्यमंत्रिपद आणि दोन-तीन महत्त्वाची खाती द्यावीत अशा मानसिकतेत भाजपाचे केंद्रीय नेतृत्व असल्याचं समजतं.
अर्थात, भाजपाच्या नेतानिवडीच्या आजच्या बैठकीनंतर, देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सत्तास्थापनेबाबत सविस्तर चर्चा होईल. त्यात पुढचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल. आता शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसणार की तडजोड करणार, याबद्दल उत्सुकता आहे.