महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत..
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 04:10 PM2019-10-22T16:10:08+5:302019-10-22T16:11:12+5:30
आता २४ ऑक्टोबरला लागणाऱ्या निकालापूर्वीपर्यंत जणू वादळापूर्वीची शांतता पसरली आहे.
रसिक वाचकहो,
आपल्या राज्यातील निवडणूक काल संपली. आता २४ ऑक्टोबरला लागणाऱ्या निकालापूर्वीपर्यंत जणू वादळापूर्वीची शांतता पसरली आहे. आबालवृद्धांत सुरू आहेत झालेल्या मतदानाबाबतचे अंदाज, पैजा व गॉसिप, गप्पा... आज त्याविषयी....
ये गं ये गं सरी, माझी झोळी भरी
ये गं, ये गं सरी, भिजले ‘घड्याळ’ जरी
सर आली धावून, गेली मला भिजवून
‘त्यांच्या’ तोंडचे पाणी लावले पळवून
सांगून हे ‘जाणता राजा’ घेई उसंत
‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...१
पावसा असा अवेळी आलास का
‘त्यांना’च भिजवूनि तू असा गेलास का
कोरडे आम्हा ठेवुनि बरसलास का रे
तरी ‘गुलाला’ने आम्ही भिजणार सारे
मी पुन्हा येईन, सांगुनि ‘देवेंद्र’ निवांत
‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...२
संपली निवडणूक, संपला प्रचार
आता करूयात निकालाचा विचार
कुठे एकतर्फी, कुठे झाली ‘घासून’
‘तज्ज्ञां’चे अंदाज सुरू पैजा लावून
उमेदवारांना मात्र निकालाची भ्रांत
‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...३
कुठल्या गावात, कोणाची आघाडी
कुठल्या भागात, कोणाची पिछाडी
कोणाचा कुणाशी ‘छुपा समझोता’
थोडंसंच वास्तव, बºयाचशा बाता
पारावरचे गप्पिष्ट रेटती खोटे धादांत
‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...४
कुणाचे ‘हिशेब’ यंदा कुणी चुकवले
कोणी कोणाला ‘कात्रज’ दाखवले
खरे काम कुणाचे, कुणाचा आभास
कोण लांबचा, कोणाचा कोण खास
रंगवले जात आहेत उलटसुलट वृत्तांत
‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...५
झाला एवढा खर्च, हिशेबही लागेना
कुणाच्या खिशात किती गेले कळेना
निवडणुकीत एजंटांनीच केली कमाई
‘भाडोत्रीं’शी नेत्यांनी केली दिलजमाई
रिकामे हात चोळत बसलेत निष्ठावंत
‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...६
कोण, कुठे ‘चालणार’-‘धावणार’
कोणाचे पत्ते कसे कापले जाणार?
कोण विक्रमांचे इतिहास घडवणार
कोण यंदा ‘इतिहासजमा’ होणार
कुणा वाटे हायसे, कुणी चिंताक्रांत
‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...७
सगळा जणू संगीत खुर्चीचाच खेळ
खुर्च्या नि भिडूंचा नाही जमत मेळ
जनमत तालावर ‘ते’ घालती चक्कर
थांबला ताल, की खुर्चीसाठी टक्कर
खेळ हा सत्तेचा चालतो अविश्रांत
‘वादळा’पूर्वी सारं कसं शांत शांत...८
- अभय नरहर जोशी