महाराष्ट्र निवडणूक 2019: सरकार स्थापनेतील विलंबामुळे सर्व पक्ष बनले टीकेचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 03:05 AM2019-11-17T03:05:44+5:302019-11-17T06:28:26+5:30
गडकरी, राऊत यांची विधाने मात्र संवादाची दारे किलकिली करणारी
मुंबई : राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले विधान वा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे केलेले वक्तव्य यावरून नवेनवे तर्कवितर्क आणि शक्याशक्यतेच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
नितीन गडकरी यांचे विधान दोन पक्षांतील संबंधांबाबत बोलकेच आहे. पण युती होऊ नये म्हणून भाजपमधील काहींनी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील बंद खोलीत झालेल्या निर्णयाचे सत्य मोदींपासून लपवून ठेवले जात आहे, असे संजय राऊत यांचे वक्तव्यही मोदींशी संवादाचे दार किलकिले करणारे असल्याचाही अर्थ जात आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी सरकार स्थापनेचे जवळपास नक्की केले असूनही अद्याप निर्णय मात्र झालेला नाही. हे तिघेही वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकमेकांविरुद्ध लढूनही भाजपच्या सत्तेबाहेर ठेवण्यासाठी एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर वरील दोन्ही विधाने बरेच काही सांगून जातात. राजकीय स्वार्थासाठी देशात अनेक ठिकाणी अशा युती व आघाड्या पूर्वीही झाल्या आहेत आणि यापुढेही होत राहतील. त्यामुळे या पक्षांचे व त्यांच्या नेत्यांचे भले होते. पण जनतेच्या हिताचा मात्र विचार होताना दिसत नाही. एकदा नैतिकता दूर सारली की मग काहीही करणे शक्य होते याचा अनुभव याआधी अनेकदा आला आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी व राऊत यांच्या वक्तव्यांकडे पाहिले तर अनेक अर्थ निघू शकतात.
राज्य भीषण आर्थिक संकटात आहे. शेतकरी ओल्या दुष्काळाने मोडून गेला आहे. घरे, जनावरे वाहून गेली आहेत. सर्व नेते आपणच जनतेचे खरे सेवक असल्याचा आव आणत असताना सरकार स्थापनेत सर्व पक्षांना होणारा विलंब जनतेच्या संतापात तेल ओतणारा आहे.
जाहीर विधाने आणि...
मुख्यमंत्रिपद आम्हाला मिळेल, असे आश्वासन अमित शहा यांनी ठाकरे यांना दिले होते. ते पाळले जात नाही, अशी शिवसेनेची टीका आहे, तर असे आश्वासन दिलेच नव्हते, असे अमित शहा यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यातूनच युतीमध्ये दरी आणखी वाढली आहे. त्यातूनच महायुती म्हणून या पक्षांनी एकत्रित येऊ न सरकार स्थापन केले नाही. राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेबाबत असमर्थता दर्शवविणारा भाजप बाहेर मात्र राज्यात आमचेच सरकार येणार, असे खात्रीने सांगत आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून पुरेसे बहुमत होत असतानाही ते सरकार स्थापन करण्यास विलंब करत आहेत. त्यामुळे हे सगळे पक्ष जनतेच्या टीकेचे लक्ष्य होत आहेत.