महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंचं 'युती'बद्दल मोठं विधान; शिवसेनेनं भाजपावर आणखी वाढवला दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 02:01 PM2019-11-07T14:01:51+5:302019-11-07T14:14:45+5:30
दोन आठवडे उलटूनही सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला नाही
मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले तरी शिवसेना, भाजपामधील तिढा कायम आहे. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मला युती तोडायची नाही. पण लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सर्व काही व्हावं. बाकी मला काही अपेक्षा नाही, असं म्हणत उद्धव यांनी चेंडू भाजपाच्या कोर्टात ढकलला आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्याचा पुनरुच्चारदेखील उद्धव यांनी केला.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत भाजपानं दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. त्यावेळी सत्तापदांच्या समान वाटपाचा शब्द भाजपाकडून देण्यात आला होता. मात्र आता भाजपानं शब्द फिरवला आहे. भाजपा मला खोटा ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्धव यांनी भाजपाच्या कोर्टात चेंडू ढकलल्यानं सत्ता वाटपाचा तिढा कायम राहण्याची चिन्हं आहेत.
आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या. विशेष म्हणजे त्यांनी भाजपासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली. लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सर्व काही व्हावं. त्यापेक्षा मला अधिक काही नको. मुख्यमंत्रिपदाबद्दल फडणवीस यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. याबद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलायला मी तयार आहे, असं उद्धव म्हणाले. मातोश्रीवर फोन उचलले जात नसल्याचं वृत्त काही दिवसांपासून येत होतं. मात्र आता उद्धव ठाकरेंनी चर्चेची तयार दर्शवली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करावा. त्यानंतर पुढील चर्चा करता येईल, अशी भूमिका उद्धव यांनी मांडली.