आंबेडकरांच्या 'या' अवाजवी मागणीमुळे तुटली 'वंचित'-एमआयएमची युती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:32 PM2019-10-03T15:32:02+5:302019-10-03T15:48:54+5:30
ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत.
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं एमआयएमने जाहीर केलं होत. तर एमआयएमने अचानक चर्चा थांबवली आणि त्यांनतर युती तुटल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. मात्र आता युती तुटण्याचे खरे कारण समोर आले आहे. एमआयएमकडे असलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघावर वंचितने दावा केल्याने युती तुटल्याचा गौप्यस्फोट खुद्द एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. वंचित आघडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सद्या औरंगाबाद जिल्ह्यात पक्षाच्या प्रचारसाठी आले आहेत. तर याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे काही नेत्यांनी ओवेसी यांची भेट घेत, युती तुटल्याचा मुद्द्यावरून चर्चा केली. यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले की, युती तोडण्याची आमची कोणतेही इच्छा नव्हती, आम्ही आजही युती करण्यास तयार आहोत. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आपण विनंती करा असेही ओवेसी यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ओवेसी म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे एमआयएमची विद्यमान जागा वंचितला सोडण्याची मागणी करत आहे. परंतु मी माझी विद्यमान जागा कशी सोडणार, असा प्रश्न सुद्धा ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला. तर आंबेडकर यांच्यासाठी आम्ही औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ सोडायला तयार झालो होतो. मात्र ते 'मध्य'वर अडवून बसल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे ओवेसी म्हणाले.
प्रत्यक्षात मध्य मतदारसंघातून २०१४ ला इम्तियाज जलील हे निवडून आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या युतीत या मतदारसंघावर एमआयएमचा नैसर्गिक अधिकार होता. त्यामुळे आंबेडकर यांची मागणी अवाजवी असल्याचे आता बोलले जात आहे. तर एमआयएमचा ताब्यात असलेल्या एका मतदारसंघासाठी आंबेडकर यांनी युती तोडली असावी का ? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.