Maharashtra Election 2019: उशिरा का होईना, आपल्याच माणसाला तिकीट दिल्याचा आनंद; खडसेंचा सूर बदलला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:07 IST2019-10-04T12:46:47+5:302019-10-04T13:07:54+5:30
भाजपानं चौथ्या यादीत एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Election 2019: उशिरा का होईना, आपल्याच माणसाला तिकीट दिल्याचा आनंद; खडसेंचा सूर बदलला!
मुंबईः भाजपानं चौथ्या यादीत एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना उमेदवारी दिली आहे. एकनाथ खडसेंना उमेदवारी नाकारल्यानं राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. त्याला आता एकनाथ खडसेंनीच पूर्णविराम दिला आहे. रोहिणी खडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खडसे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवार कोण असेल याबद्दल आपल्याला उत्सुकता होती.
जवळपास 40 वर्षांपासून आपण भाजपासाठी काम करत आलो आहोत. तुम्ही सर्वांनी यासाठी सहकार्य केलेले आहे. आतापर्यंत भाजपाच्या आदेशाचं आपण तंतोतंत पालन केलेलं आहे. भाजपानं सांगितलं तेव्हा एक मिनिटांत मी मंत्रिपद सोडलं. पक्ष बदनाम होईल असं कोणतंही काम केलेलं नाही. कार्यकर्त्यांचं म्हणणं वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवलेलं आहे. निर्णय कटू असले तरी स्वीकारत आलो. आपण पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत.
पक्षानं रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरमधून तिकीट दिलेलं आहे. मला मिळालेलं सहकार्य रोहिणी खडसेंनाही मिळेल, अशी मी आशा व्यक्त करत असल्याचं कार्यकर्त्यांना संबोधित करताना खडसे म्हणाले. रोहिणीताई आणि भाजपाच्या उमेदवाराला कष्ट करून आपल्याला निवडून आणायचं आहे. काही अडचणी पक्षासमोरही असतात. त्यामुळेच उमेदवारीसाठी विलंब लागला असेल, पण उशिरा का होईना भाजपानं आमच्यासाठी चांगला निर्णय घेतलेला आहे. आपल्याच माणसाला तिकीट मिळाल्याचा आनंद आहे. माझ्यासारखंच रोहिणीताई तुम्हाला अधिक प्रेम देण्याचा प्रयत्न करतील. सर्वांनी एकजुटीनं, एकदिलानं रोहिणीताईंना सहकार्य करावं, असंही ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत.