Maharashtra Election 2019: कन्येच्या उमेदवारीसाठी खडसे राजी? मुक्ताईनगरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:25 PM2019-10-03T12:25:31+5:302019-10-03T12:37:22+5:30
काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
मुक्ताईनगर: अखेर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. माजी मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंऐवजी त्यांची कन्या ऍड. रोहिणी खडसे मुक्ताईनगर येथून भाजपच्या उमेदवार असतील, अशी माहिती मिळते आहे. याला विश्वसनीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
या निर्णयाबाबत आज महत्वाचे पदाधिकारी व खासदार रक्षा खडसे, महानंदच्या चेअरमन मंदा खडसे यांच्यासह निकटच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चे अंती रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. उद्या दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर रोहिणी खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे संकेत मिळत आहे.
तिकीट कापल्याचे संकेत, खडसेंच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजन म्हणाले...
भाजपाची दुसरी उमेदवार यादी काल जाहीर झाली. त्या यादीतही एकनाथ खडसेंच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे खडसेंचा पत्ता कापण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र आता त्यांच्या कन्येला उमेदवार मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. यासंदर्भात खडसे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोणीही काल सायंकाळपर्यंत काहीही माहिती देणं टाळलं होतं.
खडसेंनी उमेदवारी दाखल केली मात्र ए बी फार्म नाही
कन्येला उमेदवारी देण्यासोबतच एकनाथ खडसेंना राज्यपाल पदही देण्याची चर्चा आहे. एकनाथ खडसेंना उमेदवारी मिळणार की नाही, याची चर्चा सुरू असताना काल सकाळी खासदार रक्षा खडसे मुंबईत आल्या होत्या. त्यांनी दुपारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू होते.