Maharashtra Election 2019: एकनाथ खडसेंच्या वाटेत आडवं आलं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:58 PM2019-10-04T14:58:00+5:302019-10-04T15:03:29+5:30

मुख्यमंत्रिपदाला मुकल्याने अस्वस्थ झालेल्या खडसेंकडूनही काही चुका झाल्या.

Maharashtra Election 2019: Eknath Khadse's dream to become Chief Minister takes him in trouble | Maharashtra Election 2019: एकनाथ खडसेंच्या वाटेत आडवं आलं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न!

Maharashtra Election 2019: एकनाथ खडसेंच्या वाटेत आडवं आलं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न!

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या आणखी एका खान्देशी नेतृत्वाचे पंख छाटले गेले.खडसे यांनी गेल्या ४० वर्षात पक्षाच्या वाढीसाठी भरपूर कष्ट घेतले. खडसेंना मुख्यमंत्र्यांशी जमवून घेता आले नाही, असेच सांगितले जाते.

>> सुशील देवकर

मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ऐवजी कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट अखेर जाहीर झाले अन् मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या आणखी एका खान्देशी नेतृत्वाचे पंख छाटले गेले. रोहिदास पाटील, मधुकरराव चौधरी यांच्याप्रमाणे खडसे यांनाही स्वपक्षाकडून मानहानी पत्करावी लागली.

खडसे यांनी गेल्या ४० वर्षात पक्षाच्या वाढीसाठी भरपूर कष्ट घेतले. देशपातळीवरील नेत्यांसोबत त्यांनी काम केले. त्यामुळे राज्यात ते पक्षाचे सर्वात दमदार नेते म्हणून उदयास आले. १९९५ मध्ये राज्यात सत्तेवर आलेल्या युती शासनाच्या काळात त्यांनी पाटबंधारे, महसूल यासारखी महत्वाची खाती सांभाळली. नंतरच्या काळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल विरोधी पक्षनेत्यांचा मान असल्याने २०१४ मध्ये मोदी लाटेमुळे पुन्हा भाजपा-सेना युतीचे सरकार सत्तेवर आले, त्यावेळी खडसे हेच मुख्यमंत्री होणार, असा समज खडसेंसह सगळ्यांचाच होता. पण त्यावेळीही खडसेंना १२ मंत्रिपदे देऊन समजूत घालत मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यानंतरच्या दीड-दोन वर्षांच्या कालावधीत मुख्यमंत्रिपदाला मुकल्याने अस्वस्थ झालेल्या खडसेंकडूनही काही चुका झाल्या. त्यांच्या त्या चुकांच्या प्रतीक्षेतच असलेल्या स्वपक्षातीलच लोकांनी त्यांना बरोबर मंत्रिमंडळाबाहेरचा रस्ता दाखविला, असा आरोप केला जातो. त्यात तथ्यही असल्याचे मानले जाते. कारण राज्याच्या मंत्रिमंडळातीलच इतर मंत्र्यांवर मात्र आरोप होऊनही त्यांना तात्काळ मंत्रिपद सोडावे लागले नाही. याचे कारण खडसेंना मुख्यमंत्र्यांशी जमवून घेता आले नाही, असेच सांगितले जाते. साहजिकच केंद्रीय नेतृत्वाकडेही त्याचपद्धतीने फिडबॅक जात असल्याने पाच वर्षांचा अवधी सरकारने पूर्ण करेपर्यंत खडसेंचे मंत्रीमंडळात पुनरागमन झालेच नाही. खडसेंवर आरोपांचे तोफगोळे डागणाऱ्यांना सरकारकडूनच रसद पुरविली गेल्याचीही जोरदार चर्चा होती. त्याचवेळी जिल्ह्यात खडसेंचा दबदबा कमी करण्यासाठी गिरीश महाजन यांना नेतृत्वाने बळ देण्यास सुरूवात केली. दरम्यान मंत्रीपदावर असताना तसेच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही खडसेंनी जवळच्याच अनेक लोकांना दुखावल्याचे सांगितले जाते. त्यातच खडसे हे नेतृत्वाच्या रडारवर असल्याचे लक्षात आल्यानेही अनेक समर्थक, कार्यकर्त्यांनी हळूहळू त्यांच्यापासून अंतर राखण्यास सुरूवात केली. तर जिल्ह्यांतर्गत पक्षातील छुप्या स्पर्धकांनीही खडसे पक्षातील मूळ प्रवाहापासून दूर कसे राहतील, याची काळजी घेण्यास सुरुवात केली.

मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार, हे ठासून सांगणारे फडणवीस खडसेंना पुन्हा तिकीट देऊन स्वत:ला स्पर्धा निर्माण करून घेऊ इच्छित नसल्यानेच चक्र फिरल्याचे मानले जात आहे. त्यासाठी निवडणुका जाहीर होण्याच्या दीड-दोन महिन्यांआधीपासूनच खडसेंच्या मतदार संघात त्यांची कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू करण्यात आली. मात्र खडसेंनी मीच मुक्ताईनगरमधून निवडणूक लढविणार, असल्याचा दावा करीत हे डावपेच उधळून लावले. त्यामुळे खडसेंना उमेदवारीच मिळू न देण्याची खेळी खेळली गेली. केंद्रीय नेतृत्वानेही त्यासाठी राज्यातील नेतृत्वाच्याच पाठीशी राहणे पसंत केले. या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे मानले जाण्याचे कारण म्हणजेच राज्यातील ज्या अन्य नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत दावे केले, किंवा मुख्यमंत्री व्हायला आवडेल सांगितले, त्यांनाही अचानक अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

एकेकाळी तिकीट वाटप करणाऱ्या खडसेंना स्वत:साठी तिकीट मिळविण्यासाठी प्रचंड धडपड करूनही अपयश आले. तिकीट मिळत नसल्याचे पाहून महामार्गावर रास्तारोको, ठिय्या आंदोलनही समर्थकांनी केले. मात्र एकवेळ खडसेंच्या घरात तिकीट दिले जाईल, मात्र खडसेंना नाही, असा संदेश मिळाल्याने अखेर खडसेंना शस्त्र म्यान करण्याची वेळ आली. खडसेंच्या घरात तिकीट द्यायची तयारी दर्शविली व अ‍ॅड.रोहीणी खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या मागे खडसे यांची कन्या आमदार झाली तरी मुख्यमंत्र्यांपेक्षा कनिष्ठच असल्याने मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेचा विषयच संपेल. जास्तीत जास्त राज्यमंत्रीपदावर बोळवण करता येईल, हेच गणित आहे. एकूणच पक्षासाठी ४० वर्ष धडपडणाऱ्या व मोठा जनाधार असलेल्या बहुजन नेत्याचा 'मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाने' घात केला असेच म्हणावे लागेल.

महत्त्वाच्या राजकीय बातम्याः

उशिरा का होईना, आपल्याच माणसाला तिकीट दिल्याचा आनंद; खडसेंचा सूर बदलला!

शरद पवार म्हणाले खडसे संपर्कात; पण अजितदादा तर वेगळंच सांगताहेत!

तीन तिगाडा, काम बिगाडा... एकनाथ खडसेंचा पत्ता कट होण्याची तीन कारणं!

कितीही मेकअप करा, खरा चेहरा समोर येणारच; रितेश देशमुखांचा भाजपला टोला

अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार

 

 

Web Title: Maharashtra Election 2019: Eknath Khadse's dream to become Chief Minister takes him in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.