महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला पाठिंबा दिला खरा, पण...; अपक्ष आमदार रवी राणा यांचे शरद पवारांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 10:29 PM2019-11-12T22:29:26+5:302019-11-12T22:51:17+5:30
भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच साकडे घातले आहेत.
अमरावती : महायुतीत राहून निवडणूक लढवत मुख्यमंत्री पदावरून भाजपा-शिवसेने बेबनाव झाला आहे. यामुळे भाजपासह शिवसेनेलाही सत्ता स्थापन करण्यात अपयश आले आहे. राष्ट्रवादीनेही वेळ मागितल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. याचा धसकाच अनेक आमदारांनी घेतला आहे.
रवी राणा यांचा याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असा आरोपही राणा यांनी केला. महाराष्ट्रातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. आम्हाला प्रतिनिधी म्हणून त्यांच्यापुढे जायचे आहे. त्यांच्या समस्या मांडायच्या आहेत. त्यांनी उद्या विचारले तर काय उत्तर देणार, असा प्रश्नही राणा यांनी उपस्थित केला.
भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रवी राणा यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच साकडे घातले आहेत. राष्ट्रपती राजवट झेलणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. त्यांच्या समस्यांची सोडवणूक स्थिर सरकार करू शकते. भाजपाला पाठिंबा दिला आहे. पण शरद पवारांना एक विनंती आहे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढे यावे, स्थिर सरकार स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीसांना पाठबळ द्यावे अशी विनंती राणा यांनी केली आहे.