क कमळातला, आणि क कपाटातला! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी भाजप बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 03:40 PM2019-10-16T15:40:53+5:302019-10-16T15:41:27+5:30
‘क’ कमळातला आणि ‘क’ कपाटातला दोन्ही एकच आहे, असे केले आवाहन
वेंगुर्ले : ‘क’ कमळातला आणि ‘क’ कपाटातला दोन्ही एकच आहे.त्यामुळे आपल्या मतदार संघातील भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणून आपल्या हक्काचा आमदार विधानसभेत पाठऊया.यासाठी उरलेल्या पाच दिवसांसाठी आपण महिलांनीच स्वतः उमेदवार बनून कपाट ही निशाणी घरा घरात पोहचूया असे आवाहन गाेव्याचे मुख्यमंत्री प्रमाेद सावंत यांच्या पत्नी आणि गाेवा महिला माेर्चा अध्यक्षा साै. सुलक्षणा सावंत यांनी केले.
सावंतवाडी विधानसभेचे भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्लेतील साई मंगल कार्यालयात महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना साै. सुलक्षणा सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुषमा खानोलकर, वंदना किंनळेकर, प्रज्ञा परब, सभापती स्मिता दामले, पूनम जाधव, सारिका काळसेकर, नगरसेविका साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, प्रज्ञा ढवण, डॉ. पूजा कर्पे, प्रार्थना हळदणकर, वृंदा गवंडळकर, राधा सावंत, गोव्याच्या महिला गोवा मोर्चा सचिव शीतल नाईक, पणजी बूथ अध्यक्ष सुषमा नाईक, प्रतिमा नायर, महिमा देसाई यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
साै. सावंत पुढे म्हणाल्या की आपल्या भागात गेली १० वर्षे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री केरकर उपचारासाठी चांगले सुसज्ज रुग्णालय उभारू शकले नाहीत, रोजगारासाठी एक इंडस्ट्रीज आणू शकले नाहीत, बचत गटातील महिलांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करू शकले नाहीत. त्यामुळे आता परिवर्तन पाहिजे आपल्या हक्काचा आपला आमदार पाहिजे यासाठी राजन तेली यांना निवडून आणून स्त्री शक्तीची ताकद दाखवून देऊया तसेच दिवाळीला तेली याना फराळ खायला बोलाऊया असे आवाहन त्यांनी महिलांना केले.
यावेळी बोलताना सुषमा खानोलकर यांनी आपला हक्काचा आमदार म्हणून राजन तेली यांच्या कपाट या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊया आणि कणकवलीत युती धर्म न पाळणाऱ्यांना जागा दाखवूया असे आवाहन केले.
वंदना किनळेकर यांनी सांगितले की, आपले गृहमंत्री केसरकर यांच्यावर बाहेरून पोलीस मागविण्याची वेळ आल्याने त्यांचा स्थानिक पोलिसांवर विश्वास नाही हेच दिसते. या प्रमाणेच त्यांचा स्थानिक महिलांवर विश्वास नाही म्हणून महिलांचे प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या निष्क्रिय आमदार केसरकर यांना घरी बसविणे हे आता महिलांचे पहिले काम आहे ते २१ तारीखला पूर्ण करूया असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. पुजा कर्पे यांनी मानले.