महाराष्ट्र निवडणूक २०१९: जर कुणीच मागे हटायला नाही तयार; मग कसं बनणार महायुतीचं सरकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 08:01 AM2019-11-06T08:01:26+5:302019-11-06T08:03:48+5:30
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे.
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थापनेचा संघर्ष अद्यापही सुरुच आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या दरम्यान सत्ता वाटपाचा तिढा सुटण्याचं चिन्ह नाही. मंगळवारी भाजपाने सत्ता स्थापनेचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात ढकलला आहे. अद्याप शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव मिळाला नाही. भाजपाचे दार २४ तास चर्चेसाठी खुलं आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्रीपदावर अडून असलेली शिवसेना जे ठरलंय ते द्या यावर ठाम असल्याचं दिसून आलं.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. सत्ता स्थापनेच्या तिढ्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कधीही चर्चेसाठी नकार दिला नाही. शिवसेनेकडूनच चर्चा बंद करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या तिढ्यात दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सांगितले आहे.
तसेच भाजपाकडून प्लॅन बीदेखील तयार करण्यात येत आहे. विधानसभेत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले आहेत तर काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने ही संख्या ११८ पर्यंत पोहचली आहे. जर शिवसेनासोबत आली नाही तरी भाजपा बहुमत सिद्ध करु शकते असा दावा भाजपाच्या एका मंत्र्याने केला आहे. तसेच शिवसेना आघाडीच्या पाठिंब्याने सरकार बनवेल हा अंदाज या ज्येष्ठ मंत्र्याने फेटाळून लावला आहे.
भाजपाच्या या मंत्र्याने सांगितले की, आमच्या माहितीनुसार जर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार बनवू पाहत असेल तर सभागृहात ते बहुमत सिद्ध करु शकणार नाही कारण त्यांना काँग्रेसची मदत मिळणार नाही. त्यामुळे शिवसेना आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करणार नाही असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप-शिवसेनेतील तणाव दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपवर सडकून टीका करणारे खा.संजय राऊत यांचा सूर नरमाईचा दिसला. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही असल्याचे ते पुन्हा म्हणाले. पण त्यात भाजप नेतृत्वाला टार्गेट करण्याचा सूर नव्हता. भाजप नेतृत्वाला लक्ष्य करताना राऊत पथ्य पाळताना दिसतील, असा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने बोलताना केला. भाजपला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे मान्य केल्यास प्रसिद्धी माध्यमांसमोर काय सांगायचे, असा पेच शिवसेनेसमोर आहे. मात्र, त्याला तात्विक भूमिकेचा मुलामा देऊन भूमिकेचे समर्थन केले जाण्याची शक्यता आहे.