Maharashtra Election 2019: अहो मी पतंग उडवित होतो...; 'डान्सिंग' व्हिडीओवर ओवेसींचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 07:58 PM2019-10-19T19:58:17+5:302019-10-19T20:00:57+5:30
ओवेसींचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
औरंगाबाद: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत जिन्यावरुन उतरत असलेले व्हिडीओ गाण्यावर नाचत असताना दिसत होते. या डान्सवर आता ओवेसींनी खुलासा केला आहे. आपण नाचत नव्हतो. तर पक्षाचं चिन्ह असलेल्या पतंगाचा अभियन करून दाखवत होतो, असं ओवेसी म्हणाले.
सभेला उपस्थित असलेल्यांना मी पतंग उडवण्याचा अभिनय करून दाखवत होतो. कारण माझ्या पक्षाचं निवडणूक चिन्ह पतंग आहे, असं ओवेसी यांनी सांगितलं. 'माझ्या पक्षाचं चिन्ह पतंग आहे. आमच्या प्रत्येक सभेनंतर आम्ही पतंग उडवण्याचा अभिनय करून निवडणूक चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, असा प्रयत्न करतो. कोणीतरी नेमका तेवढाच भाग एडिट केला आणि त्यावर गाणं लावून तो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर काहींनी मी नाचत असल्याचं वृत्त दिलं. मात्र त्यात तथ्य नाही', अशा शब्दांत ओवेसींनी स्पष्टीकरण दिलं.
Maharashtra: AIMIM Chief Asaduddin Owaisi performs a dance step after the end of his rally at Paithan Gate in Aurangabad. (17.10.2019) pic.twitter.com/AldOABp2yd
— ANI (@ANI) October 18, 2019
औरंगाबादमधील पैठण गेट परिसरात शुक्रवारी एमआयएमची सभा झाली. त्यावेळी व्यासपीठावरुन खाली उतरत असताना ओवेसींनी पतंग उडवण्याचा अभिनय करुन दाखवला. राज्यात एमआयएमचा एकच खासदार आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील लोकसभेत औरंगाबादचं नेतृत्त्व करतात. जिल्ह्यात विधानसभेच्या नऊ जागा आहेत. अनेक ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. जिल्ह्यातील सिल्लोड, औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघांकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
औरंगाबाद शहरात शिवसेना-भाजप युतीने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघांत एमआयएम पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. यातील औरंगाबाद मध्य मतदारसंघ एमआयएमसाठी महत्त्वपूर्ण आहे. मागील निवडणुकीत एमआयएमने हा मतदारसंघ सेनेकडून हिसकावून घेतला होता. यंदा मतदारसंघ परत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरू आहेत.