Maharashtra Election 2019 : जर विरोधकच उरलेले नाहीत तर मोदी, शहांच्या सभांची गरज काय? जयंत पाटील यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 11:55 AM2019-10-11T11:55:09+5:302019-10-11T11:55:51+5:30
मुख्यमंत्र्यांना जर राज्यात विरोधकच दिसत नसतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना १० सभा, अमित शहांना ३० सभा आणि मुख्यमंत्र्यांना १०० सभा घेण्याची गरज काय?
जळगाव: मुख्यमंत्र्यांना जर राज्यात विरोधकच दिसत नसतील. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना १० सभा, अमित शहांना ३० सभा आणि मुख्यमंत्र्यांना १०० सभा घेण्याची गरज काय? मुख्यमंत्र्यांनी तर महाजनादेश यात्रेनिमित्त संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. त्यामुळे जर त्यांना विरोधकच दिसत नसतील तर सरळ घरी बसा, आपोआप निवडून याल, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवार, ११ रोजी सकाळी आयोजित पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांवर केली.
ते म्हणाले की, सत्ताधा-यांना विरोधी पक्षांची भीती वाटतेय, शरद पवार नावाची भिती वाटतेय. म्हणून प्रत्येक सभेमध्ये अमित शहा हे शरद पवार व राष्ट्रवादीला टारगेट करताय. याचाच अर्थ राष्ट्रवादी पक्ष भाजप-सेनेचा समर्थपणे प्रतिकार करतेय.
महाजनांनी स्वत:ची जागा टिकवली तरी आश्चर्य वाटेल
‘राष्ट्रवादीचे लोक एसीत बसून सर्वेक्षण करतात त्यामुळे त्यांना परिस्थितीचा अंदाज येत नाही’ अशी टीका गिरीश महाजन यांनी केली असल्याबाबत विचारणा केली असता जयंत पाटील म्हणाले की, आता ५ वर्ष एसीत कोण बसलय?. राज्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी प्रकरणी घेतलेल्या भूमिकेनंतर युवा वर्गाकडून तसेच जनतेकडून त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत होत असून राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व जागा निवडून येतील, असे सांगण्याची वेळ पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर आली आहे. मात्र त्यांनी स्वत:ची जागा टिकवली तरी मला आश्चर्य वाटेल, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
ईडी व आयटी मागे लावण्यात मुख्यमंत्री व्यस्त
‘मुख्यमंत्री म्हणतात की राज्यात विरोधकच उरलेले दिसत नाहीत.’ या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, विरोधकांना स्वत:च्या पक्षात घेणे व त्यासाठी ईडी व आयटी मागे लावणे यातच मुख्यमंत्री व्यस्त असल्याने त्यांना राज्यात वेगळ काही करता आलेले नाही. जे विरोधक संघटीतपणे त्यांना विरोध करताय त्यांच्यामागे राज्यातील लोक उभे राहिलेले दिसत आहेत. प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे असे विधान करून ते विरोधकांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र निकालानंतर त्यांच्या लक्षात येईल की मुख्यमंत्र्यांच्या पक्षापेक्षा विरोधकांची ताकद विधानसभेत जास्त असेल.
बंडखोरांवर कारवाई करणार
जर पक्षाने तडजोड केली तर तडजोड आणि कार्यकर्त्याने केली तर बंडखोरी असे धोरण योग्य आहे का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, पक्षाने केलेली तडजोड ही पक्षहितासाठी धोरण ठरवून केलेली असते. त्याची तुलना बंडखोरांच्या तडजोडीशी होऊ शकत नाही. पक्षाकडून बंडखोरांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
चंद्रकांत पाटील पुरात वाहून आलेले त्यांना गांभीर्याने घेत नाही
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण संपलेले असेल, असे विधान केले असल्याबाबत विचारणा केली असता जयंत पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे पुरात पुण्याला वाहून आलेले उमेदवार आहेत. वाहून आलेला उमेदवार नको, अशी पुण्यातील मतदारांची भूमिका आहे. त्यांनी पवारांच्या राजकारणावर वक्तव्य करावे, हे कुणी फार गांभीर्याने घेते असे मला वाटत नाही, अशी टीका केली.
सरकार आर्थिक संकटात असल्याने खाजगीकरणाचा मार्ग
एमटीएनएल, बीएसएनएल बंद करण्याचा निर्णय घेतला असून आता रेल्वेच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, राज्यासोबतच केंद्र सरकारही आर्थिक संकटात आहे, त्यातून खाजगीकरणाचा मार्ग अवलंबला जात आहे. बीएसएनएल व एमटीएनएलचे गेल्या दोन वर्षांपासून जिओसाठी खच्चीकरण सुरू आहे.