महाराष्ट्र निवडणूक 2019: 170 आमदारांची पत्रे सादर करू; संजय राऊत यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 03:37 AM2019-11-19T03:37:48+5:302019-11-19T06:21:09+5:30
शिवसेना खासदार संजय राऊत प्रचंड आशावादी
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा दावा करू इच्छिणाऱ्या पक्षांना पाठिंबा दिल्याचे प्रत्येक आमदाराचे त्याच्या स्वाक्षरीचे पत्र सादर करावे, अशी अट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घातली असल्याच्या ‘लोकमत'च्या वृत्ताला शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी सोमवारी दुजोरा दिला. ते म्हणाले की, 288 पैकी 170 आमदारांची पाठिंब्याची पत्रे लवकरच राज्यपालांना सादर करू.
सरकार स्थापनेसाठीच्या पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या निळ्या शाईत सही असलेले पत्र द्यावे, त्यावर आपण स्वखुशीने स्वाक्षरी केली आहे असे आमदाराने लिहून द्यावे आणि प्रत्येक पत्र संबंधित पक्षाच्या नेत्याने साक्षांकित करावे, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सांगितले आहे.
खा. राऊत म्हणाले की, आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्रांसह आम्ही राज्यपालांची भेट घेऊ. त्यानंतर आणखी आमदारही आमच्या सरकारला पाठिंबा द्यायला पुढे येतील. आमदारांचे निळ्या शाईतील सहीचे स्वतंत्र पत्र सादर करावे, हे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केले होते.