Maharashtra Election 2019: चंपानंतर राज ठाकरेंच्या सभेत 'टरबूज'; उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 09:45 PM2019-10-16T21:45:05+5:302019-10-16T21:48:59+5:30
राज ठाकरे यांच्या प्रश्नांनंतर उपस्थितांमध्ये एकच हशा
नाशिक: निवडणुकीत चंपाची चंपी करणार असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं होतं. यानंतर आता राज यांनी नाशिकमधील सभेत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आजकाल काही पुरुषदेखील गर्भवती असल्यासारखं वाटतात, असं राज यांनी म्हटलं. यावेळी राज यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र राज यांच्या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० चा राज्यातील निवडणुकीशी संबंध काय, असा प्रश्न उपस्थित करत राज यांनी सत्ताधाऱ्यांना राज्यासमोरील प्रश्नांवर बोलण्याचं आव्हान दिलं. 'शेतकरी मरतात, कामगार मरतात, युवकांना रोजगार नाही. तरी यांना काहीच वाटत नाही. निवडणुकीत नुसती मजा सुरू आहे. पण मी असा राहू शकत नाही. कारण बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, हीच माझ्या कामाची पद्धत आहे,' असं राज ठाकरे म्हणाले.
या जगात सगळं काही होऊ शकतं. काहीच अशक्य नाही. पुरुष गर्भवती राहू शकत नाही याशिवाय या जगात अशक्य काहीच नाही, असं राज ठाकरे म्हणाले. यानंतर पुढे बोलताना आजकाल काही माणसंदेखील गरोदर असल्यासारखी दिसतात, ही गोष्ट वेगळी, असं राज यांनी म्हटलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी राज काही वेळ शांत उभे राहिले. यानंतर माझ्या वाक्यानंतर तुम्हाला कोण दिसलं मला माहीत नाही.. जो कोण तुम्हाला दिसला असेल त्यात आनंद घ्या, असं राज यांनी म्हटलं. यानंतर गर्दीतून काही शब्द ऐकू येऊ लागले. त्यांना प्रतिसाद देत जॅकेट म्हणजे कोण, कोट आणि टरबूज म्हणजे कोण, असे प्रश्न राज यांनी विचारताच पुन्हा उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली.