Maharashtra Election 2019: कलम 370 वर राज ठाकरेंचं अवघ्या दोन शब्दांत भाष्य; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 09:42 PM2019-10-13T21:42:29+5:302019-10-13T21:46:11+5:30
पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा
मुंबई: काश्मीरमधून काढून टाकण्यात आलेल्या कलम 370 चा मुद्दा राज्याच्या निवडणूक प्रचारात वारंवार उपस्थित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांनाराज ठाकरेंनी दोन शब्दात उत्तर दिलं आहे. 'काश्मीरमधून कलम 370 हटवलंत. 'अभिनंदन, पुढे?'', अशा अवघ्या दोन शब्दांमध्ये राज यांनी या विषयावर भाष्य केलं. तुम्ही कामावर नव्हे, तर भावनेवर मतदान करता. याचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारे राज्याशी संबंधित नसलेले मुद्दे राज्याच्या निवडणुकीत काढले जातात, असं राज ठाकरे उपस्थितांना म्हणाले. ते मालाडमधील प्रचारसभेत बोलत होते.
तुम्ही थंड राहता. तुम्ही पेटून उठत नाही. त्यामुळेच तुम्हाला सत्ताधारी गृहीत धरतात, असं राज ठाकरे म्हणाले. पुन्हा सत्ता द्या, वेगळा विदर्भ करू, अशी भाषा भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार करतात. महाराष्ट्र म्हणजे काय तुमच्या वाढदिवसाचा केक वाटला का?, असा प्रश्न राज यांनी विचारला. शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला. तर त्यांच्या आई जिजामातांचा जन्म सिंदखेडराजामध्ये झाला. महाराष्ट्राचे तुकडे करुन तुम्ही आई आणि मुलाची ताटातूट करणार का, असादेखील सवाल राज यांनी उपस्थित केला.
राज ठाकरेंनी बुलेट ट्रेनवरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. दूरवर असणारी ठिकाणं जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा वापर करण्यात येतो. मग मुंबई, अहमदाबाद या दोन जवळच्या शहरांना जोडण्यासाठी बुलेट ट्रेन सुरू करण्याचं कारण काय, असा प्रश्न राज यांनी विचारला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याचा राग अद्याप काहींच्या मनात आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप राज यांनी केला.