Maharashtra Election 2019: कल्याण डोंबिवलीसाठीचं साडेसहा हजार कोटींचं पॅकेज गेलं कुठे?; राज ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 09:49 PM2019-10-12T21:49:33+5:302019-10-12T21:51:20+5:30
विविध मुद्द्यांवरुन भाजपा, शिवसेना सरकारचा समाचार
कल्याण: महापालिका निवडणुकीवेळी मुख्यमंत्री कल्याण डोंबिवलीला साडेसहा हजार कोटींचं पॅकेज देऊ म्हणाले होते. त्या पॅकेजचं पुढे काय झालं? ते पैसे गेले कुठे? असे प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कल्याणमधील सभेत उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे धापाच असल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी राज यांनी आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिवस्मारक या मुद्द्यांवरुन सरकारवर जोरदार टीका केली.
अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभारण्याची टूम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारनं काढली होती. यानंतर राज्यात भाजपा, शिवसेनेचं सरकार आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे समुद्रात गेले. त्यांनी पाण्यात काहीतरी टाकलं आणि म्हणाले स्मारक इथे होणार. त्या स्मारकाचं पुढे काय झालं? ज्या ठिकाणी जलपूजन झालं, ती जागा आता मोदी, फडणवीस आणि उद्धव यांच्यातला एक जण तरी दाखवू शकतो का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चीनवरुन मागवला. मग आता महाराजांच्या स्मारकासाठी शिल्पकारदेखील चीनमधूनच मागवणार का, अशा प्रश्न राज यांनी विचारला.
कलम ३७० चा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपा अध्यक्ष अमित शहांनादेथील राज यांनी लक्ष्य केलं. कलम ३७० रद्द केल्याबद्दल अभिनंदन. आता काश्मीरमधील परिस्थिती सुधारा, असं राज म्हणाले. पण काश्मीरमधून रद्द केलेल्या कलम ३७० चा महाराष्ट्रातील निवडणुकीशी संबंध काय, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गेल्या पाच वर्षांत १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण शहा त्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. शहा ज्यावेळी कलम ३७० वर बोलत होते, त्याचवेळी त्याच भागात एका शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली. पण मुख्य विषयांवरुन लोकांचं लक्ष विचलित करायचं काम भाजपाकडून सुरू आहे. त्यासाठीच कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले.