Maharashtra Election 2019: पैशाचं काम अडलं की राजीनाम्याच्या धमक्या; राज ठाकरेंचं शिवसेनेवर शरसंधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 08:40 PM2019-10-13T20:40:43+5:302019-10-13T20:57:21+5:30
राज ठाकरेंकडून शिवसेना, भाजपाचा समाचार
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरेंनी राजीनाम्यांच्या इशाऱ्यावरुन शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. पैशांची कामं अडल्यावर शिवसेनेकडून राजीनाम्याच्या धमक्या दिल्या जायच्या. शिवसेनेच्या धमक्या सर्वसामान्यांसाठी नव्हे, तर केवळ आणि केवळ पैशांसाठी होत्या. हेच करून यांनी पाच वर्ष जनतेला मूर्ख बनवलं, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला लक्ष्य केलं. ते मागाठाणेत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते.
राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात शिवसेना, भाजपावर तोफ डागली. शिवसेना, भाजपाच्या बॅनरवर हीच ती वेळ असा मजकूर आहे. मग पाच वर्षे वेळ नव्हती का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. शिवसेनेच्या जाहीरनाम्यावरदेखील राज यांनी टीका केली. 'आरेमधील झाडं कापू देणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका होती. तिथली झाडं एका रात्रीत कापून झाली. त्यानंतर आमचं सरकार आलं की आरेला जंगल म्हणून घोषित करू असं शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतात. आता आरेला जंगल घोषित करून करणार काय? तिथे गवत लावणार का?', असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले.
यावेळी रस्त्यांमधल्या खड्ड्यांवरही राज ठाकरे शिवसेना, भाजपावर बरसले. 2014 मध्ये शिवसेनेनं रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाचं काय झालं, असा सवाल त्यांनी विचारला. सध्या सिटी बँक अडचणीत आली आहे. ती शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची आहे. या प्रश्नात शिवसेनेनं काय केलं. आरे असो वा अडचणीत सापडलेली बँक, याबद्दल शिवसेनेच्या जाहीरनाम्यात एक शब्दसुद्धा नाही, असं म्हणत राज यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं.