Maharashtra Election 2019: ...म्हणून बीएमडब्ल्यूचा कारखाना महाराष्ट्रातून गेला; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 09:04 PM2019-10-14T21:04:19+5:302019-10-14T21:12:46+5:30
मराठी अस्मितेवर भाष्य; विलासराव देशमुख सरकारच्या काळातील घटनेचं उदाहरण
पुणे: आपल्याला आपल्या भाषेचा अभिमानच वाटत नाही. मराठीबद्दल आम्हाला ममत्वच नाही, असं मनसेप्रमुख राज ठाकरेंनी पुण्यातील प्रचारसभेत म्हटलं. भाषिक अस्मितेवर बोलताना राज यांनी दाक्षिणात्य राज्याचं उदाहरण दिलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना घडलेली एक घटना राज यांनी यावेळी सांगितली. ते पुण्यातील कसब्यात बोलत होते.
Maharashtra Assembly Election 2019 : 'चंपा'ची 'चंपी करणार, पुण्यात राज ठाकरेंचा भाजपाला 'मनसे' टोला
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्यात बीएमडब्ल्यूचा कारखाना येणार होता. मात्र हा कारखाना महाराष्ट्रात आला नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 'विलासराव मुख्यमंत्री असताना बीएमडब्ल्यूला राज्यात कारखाना सुरू करायचा होता. त्याचवेळी मर्सिडिजनं महाराष्ट्रात कारखाना सुरू केला होता. बीएमडब्ल्यू प्रकरणात विलासरावांनी राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या एका दाक्षिणात्य अधिकाऱ्याला लक्ष घालायला सांगितलं. यानंतर बीएमडब्ल्यूचे काही उच्चपदस्थ अधिकारी त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्याला भेटायला आले. मात्र त्यानं कंपनीला आवश्यक गोष्टी पुरवण्यास नकार दिला,' असं राज ठाकरेंनी सांगितलं.
Maharashtra Election 2019 : बाळासाहेब असते तर शिवसेना लाचार दिसली नसती- राज ठाकरे
'कंपनीच्या अधिकाऱ्यांना दाक्षिणात्य अधिकाऱ्यानं कारखान्यासाठी आवश्यक गोष्टींबद्दल विचारणा केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्या अधिकाऱ्याला सांगितल्या. मात्र कंपनीची एकही मागणी पूर्ण होऊ शकत नसल्याचं दाक्षिणात्य अधिकाऱ्यानं बैठकीत म्हटलं. त्यानंतर कंपनीची मंडळी निघून गेली. ती माणसं निघून जाताच दाक्षिणात्य अधिकाऱ्यानं त्याच्याच बॅचमधल्या एका अधिकाऱ्याला फोन केला. तो अधिकारी तामिळनाडूत कार्यरत होता. मी आता बीएमडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना कारखान्यासाठी नकार दिला आहे. तू त्यांना तातडीनं फोन कर आणि तो कारखाना तुमच्याकडे घे. याला म्हणतात आपल्या राज्यावरचं प्रेम,' असा किस्सा राज यांनी सांगितला.