Maharashtra Election 2019: जाहीरनामा काढणार नाही तर फाडणार; राज ठाकरेंची भाजपा- शिवसेनेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 01:12 PM2019-10-14T13:12:00+5:302019-10-14T13:21:48+5:30
Maharashtra Election 2019: शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार' असं ५ वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं देण्यात आली होती.
शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार' असं ५ वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं देण्यात आली होती. सरकारने 5 वर्षात दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत आणि आता सत्तेत येण्यासाठी पुन्हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मला एकाने विचारलं की मनसेचं जाहीनाम्याचं कायं मी त्याला म्हणलं मी जाहीरनामा काढणार नाही तर विधानसभेत सत्ताधाऱ्यांचा जाहीरनामा फाडणार असं म्हणत मनसेप्रमुखराज ठाकरेंनी भाजपा व शिवसेनेने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या भ्रष्टाचारी लोकांना भाजपने तिकिटं दिली, मग काय बदल झाला? काय बदल होणार आहे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचप्रमाणे नोटबंदीसारख्या निर्णयामुळे आज देशभरात मंदी आली आहे. हे आर्थिक मंदीचे दिवस कुणामुळे आले? त्यात भाजपाचे कायदामंत्री रवीशंकर प्रसाद म्हणतात 'हिंदी चित्रपट कोट्यवधी कमावतात म्हणजे मंदी नाही.' मग देशातले सर्व उद्योगधंदे बंद होत आहेत, ह्याला काय म्हणतात? हजारो तरुण बेरोजगार होत आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. यवतमाळमधील वणी मतदारसंघातील प्रचारसभेत ते बोलत होते.
दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे असं भाजपाने जाहिरनाम्यात लिहिलं होतं. या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या कशा वाढल्या? गेल्या 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तसेच ज्यांनी बँका बुडवल्या ते मजेत आहे, पूल कोसळले माणसं मेली, या गोष्टींचा राग येत नाही, 5 वर्षापूर्वी यांनी काय सांगितले, किती गोष्टी केल्या याबाबत कोणीही विचारणा केली नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्याचं भाषण होण्यापूर्वी बाजूच्या गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.