Maharashtra Election 2019 : '370'चा महाराष्ट्राशी संबंध काय विचारणाऱ्यांनो, 'डुब मरो'; मोदींचा पवारांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:39 PM2019-10-16T12:39:37+5:302019-10-16T12:44:23+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम 370 वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे.
अकोला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलम 370 वरून शरद पवारांसह विरोधी पक्षांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. कलम 370 हटवल्याने देशातील जनता आनंदी आहे. मात्र या निर्णयामुळे काही जणांचा चेहरा उतरला आहे. त्यांना त्रास होत आहे. अशी मंडळी कलम 370 चा महाराष्ट्राशी काय संबध आहे, असा सवाल विचारत आहेत. कलम 370 चा महाराष्ट्राशी संबंध काय असे विचारणाऱ्यांनो डूब मरो, असा हल्लाबोल नरेंद्र मोदींनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आज अकोला येथे झाली यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ''कलम 370 शी महाराष्ट्राशी देणंघेणं नाही, असं म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. अशा लोकांनी कान उघडून उघडा की, जम्मू काश्मीर आणि तेथील जनता ही भारतमातेचीच लेकरे आहेत. आज संपूर्ण देश एक होऊन काश्मीरच्या मागे उभा आहे. देशाच्या रक्षणासाठी या शिवरांयांच्या भूमीतील मावळे हौतात्म्य पत्करत आहेत. आणि तुम्ही कलम 370 चा महाराष्ट्राशी काय संबंध म्हणून विचारणा करता.'' असे मोदी म्हणाले.
PM Modi in Akola: At one time, there were regular incidents of terrorism and hatred in Maharashtra. The culprits got away, and settled in different countries. India wants to ask the people who were in power then, how did all of this happen? How did they escape? #Maharashtrapic.twitter.com/zUNOsBVz0j
— ANI (@ANI) October 16, 2019
मतांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचा फार नुकसान झाले असेही त्यांनी सांगितले.''मतांच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले आहे. एकेकाळी महाराष्ट्रात बॉम्बस्फोट व्हायचे. मुंबईत, ट्रेन, बस, महत्त्वाच्या इमारतींमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे. पण याबाबत ज्या लोकांकडे संशयाची सुई गेली ते देश सोडून पळाले. त्यांनी शत्रू राष्ट्रांत बस्तान बसवले. हे कसे झाले. एवढे मोठे गुन्हेगार देशाबाहेर कसे काय पळाले,''असा सवालही मोदींनी शरद पवार आणि अन्य नेत्यांचं नाव न घेता उपस्थित केला.
यावेळी सरकारी संस्थांवर टीका करणाऱ्यांवरही मोदींनी टीका केली. अनेक भ्रष्टाचाऱ्यांचे एक ना एक दिवस पितळ उघड पडणार होतं. त्यामुळे जनतेला उत्तर द्यावं लागेल याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे त्यांनी खोट्याची मदत घेऊन विविध संस्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली. संकट आलं की खोट्याची मदत होईल असं वाटलं होतं. पण वेळ बदलली आहे. तुमच्या प्रत्येक कृतीचा जाब देश विचारल्याशिवार राहणार नाही, असा टोलाही मोदींनी लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या भ्रष्टवादी युतीने राज्याला अनेक वर्षे मागे लोटले अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.