Maharashtra Election 2019: शाळेमध्ये पोरालां फटकारलं की तो बापाला घेऊन यायचा; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 07:27 PM2019-10-11T19:27:55+5:302019-10-11T19:28:34+5:30
Maharashtra Election 2019: आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत.
विधानसभा निवडणूकीचा प्रचार सुरु झाला असून काही दिवसांवर मतदान आलं आहे. पण निवडणुकीत मजाच येत नाहीए, कारण समोर कोणी दिसतच नाही. आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. यावर कोणी विरोधकच समोर नसल्याचे मुख्यमंत्री म्हणताय मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आखाडा खोदायला येताय का? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, राज्यातील उद्योगधंदे आलेले असताना सरकार याकडे दुर्लक्ष करते आज युवकांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे, तरी देखील राज्य सरकार गाफील आहे. तसेच मॅग्नेटिक महाराष्ट्राची स्वप्न लोकांना दाखवण्यात आली होती, मात्र या माध्यमातून नोकरी कोणालाच उपलब्ध झाली नसल्याची टीका त्यांनी भाजपा सरकारवर केली. त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं चांगला भाव मिळेल, मात्र सरकारकडून निर्यातीवर बंदी घालून पाकिस्तानमधून कांदा आयात करायला सुरुवात केली असल्याचे देखील अमोल कोल्हेंनी यावेळी सांगितले. सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी देशाच्या पंतप्रधानांना दहा सभा तर गृहमंत्री अमित शहांना वीस सभा घ्यावा लागतात. यामध्येचं भाजपा सरकारचे अपयश दिसून येतं असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शाळेमध्ये एखाद्या पोरालां फटकारलं की तो पोरगा बापाला शाळेत घेऊन यायचा, अशीच परिस्थिती मुख्यमंत्र्यांवर आली तर नाही ना? असा टोला देखील अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना लगावला आहे.