Maharashtra Election 2019: लढाई पैलवानांशी होते, इतरांशी नाही; पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 05:50 PM2019-10-12T17:50:38+5:302019-10-12T18:18:31+5:30
शरद पवारांकडून शिवसेना, भाजपाचा समाचार
सोलापूर: आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणीच विरोधक नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला आहे. सोलापूरमधील बार्शीत पवारांनी आज प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली.
शरद पवारांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बार्शीत राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलताना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. 'मुख्यमंत्री म्हणतात, इथे लढाईच नाही. कुस्तीसाठी कोणी समोर नाही. पण कुस्ती पैलवानांची होते. अशांची (हातवारे करून) होत नाही,' अशी टीका पवारांनी केली. पवारांनी केलेल्या हातवाऱ्यांवर भाजपा नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
यावेळी शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या दिलीप सोपल यांचादेखील समाचार केला. 'विकास करायचा आहे असं म्हणून सोपलांनी पक्ष सोडला. मग इतकी वर्ष काय केलं?,' असा सवाल पवारांनी केला. यावेळी त्यांनी १० रुपयांच्या जेवणाच्या थाळीवरुन शिवसेनेलादेखील लक्ष्य केलं. यापूर्वी शिवसेनेकडून १ रुपयात झुणका भाकर सुरू करण्यात आली होती. काय झालं त्याचं? झुणका भाकर केंद्र बंद पडली. मात्र, तेथील जागा हडपण्यात आल्या आहेत. त्या जागेवर इतर उद्योगधंदे सुरू असल्याचं पवार यांनी म्हटलं. आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा प्रश्न यावेळी पवारांनी विचारला.