Maharashtra Election 2019: घरोबा एकदाच करायचा असतो; सारखं कुंकू बदलायचं नसतं: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 04:57 PM2019-10-16T16:57:13+5:302019-10-16T17:28:58+5:30
बीड शहरातील प्रचारसभेत शरद पवार बोलत होते.
मी गुदमरलो होतो म्हणून त्या घरी गेलो असे सांगत इथल्या नेतृत्वाने नवा घरोबा केला. ज्यांना तीन वेळा मंत्री केलं, सत्तेची ऊब आणि शक्ती दिली ते असं वागल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीराष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
शरद पवार यांच्या झंझावती प्रचार दौऱ्यानंतर त्यांचा भाषणातील हातवारे आणि टीका टीपण्णी चर्चेचा विषय बनत आहे. बीडमध्ये आज पवार यांची सभा घेण्यात आली. या सभेत पवारांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर जहाल टीका केली. शरद पवार या सभेत म्हणाले की, सारखं कुंकू बदलायचं नसतं. घरोबा एकदाच करायचा असतो आणि तिथे प्रामाणिकपणाने राहायचं असतं. दुसऱ्या घरोब्याचा शोध केला तर लोक त्याबद्दल काय बोलतात हे न बोललेलंच बरं असल्याचे त्यांनी सांगितले.
१९८० साली मी बीड जिल्ह्यात निवडणुकीसाठी जे उमेदवार दिले ते सगळे निवडून आले, त्याची पुनरावृत्ती यावेळी नक्की होणार. आज नवी पिढी उभारण्याची भूमिका आपण घेतली आहे. या भूमिकेला मोठा पाठिंबा बीड जिल्ह्यातून मिळतोय. परिवर्तनाच्या या लढ्यात बीडची जनता पुढाकार घेईल असा विश्वास देखील शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.