Maharashtra Election 2019: एकनाथ खडसेंना तिकीट नाहीच?; भाजपाने पाठवला 'वेगळा' निरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 06:37 PM2019-10-02T18:37:41+5:302019-10-02T19:10:46+5:30

मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक 2019: मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे प्रतिनिधित्व करतात. 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं होतं.

Maharashtra Election 2019: No ticket for Eknath Khadse? BJP sends 'different' message | Maharashtra Election 2019: एकनाथ खडसेंना तिकीट नाहीच?; भाजपाने पाठवला 'वेगळा' निरोप 

Maharashtra Election 2019: एकनाथ खडसेंना तिकीट नाहीच?; भाजपाने पाठवला 'वेगळा' निरोप 

Next

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने 125 जणांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गजांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यातच मुक्ताई नगर मतदारसंघातून भाजपा नेते एकनाथ खडसेंनी यादीत नाव घोषित होण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र एकनाथ खडसेंचे नाव दुसऱ्या यादीतही नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मुक्ताईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे प्रतिनिधित्व करतात. 2014 मध्ये भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांना महसूल मंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र जमीन घोटाळ्याच्या आरोपावरुन एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. तेव्हापासून एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळापासून दूर ठेवलं जात आहे. अशातच यंदाच्या निवडणुकीच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसेंचे नाव नसल्याने खडसेंना उमेदवारी मिळणार का? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसेंचं नाव नाही, खडसेंऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून तिकीट देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या खडसेंना पुन्हा एकदा पक्षाने डावललं असल्याचं बोललं जातं आहे. 

याबाबत पक्षाची अधिकृत यादी जाहीर झाल्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. मंगळवारी एकनाथ खडसेंनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांना सांगितले होते की, यादीत माझं नाव आहे की नाही मला ठाऊक नाही. पक्षाचे काम इमाने इतबारे केले आहे. अनेक प्रलोभने आली, पण कधी पक्ष सोडला नाही. पुढच्या यादीची प्रतीक्षा करूया, असं सांगत कालाय तस्मै नम: अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये माजी मंत्री  समाजाचे नेते एकनाथ खडसे यांचे नाव आले नाही. त्यामुळे हा समाजाचा अपमान असून, खडसे यांना भाजपने न्याय न दिल्यास सकल लेवा समाजाची बैठक घेऊन भोरगाव लेवा पाटीदार पंचायत योग्य तो निर्णय घेईल, असा इशारा भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील यांनी दिला आहे. याचा परिणाम राज्यातील किमान ३५ विधानसभा मतदारसंघांवर होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. याचबरोबर त्यांनी भाजप नेतृत्वाचा निषेध केला आहे.
 

Web Title: Maharashtra Election 2019: No ticket for Eknath Khadse? BJP sends 'different' message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.