Maharashtra Election 2019 : कांद्याने केलाय शेतकऱ्यांचा वांदा

By अतुल कुलकर्णी | Published: October 12, 2019 01:30 AM2019-10-12T01:30:59+5:302019-10-12T01:31:21+5:30

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला भेट दिली तेव्हा उमेदवार आणि मतदार दोघेही निवांत असल्याचे चित्र होते.

Maharashtra Election 2019: Onion exports farmers to tears in Maharashtra | Maharashtra Election 2019 : कांद्याने केलाय शेतकऱ्यांचा वांदा

Maharashtra Election 2019 : कांद्याने केलाय शेतकऱ्यांचा वांदा

Next

- अतुल कुलकर्णी

निवडणुकीच्या तोंडावर केलेली कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारा प्रश्न आहे. गावोगावी फिरताना अनेक शेतकरी हा मुद्दा बोलून दाखवतात. लोक देशाविषयी किंवा राज्यातल्या प्रमुख प्रश्नाविषयी बोलतात असे दिसत नाही पण त्यांच्या रोजच्या जगण्याचे प्रश्न मात्र पोटतिडकीने मांडतात, असा अनुभव अनेक ठिकाणी येत आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे-पाटील यांचाही तोच मुद्दा आहे.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला भेट दिली तेव्हा उमेदवार आणि मतदार दोघेही निवांत असल्याचे चित्र होते. मतदार संघात कुठेही स्पर्धा दिसली नाही. शिवसेनेला उमेदवार हवा तो मिळाला नाही. माजी खा. आढळराव पाटील किंवा त्यांच्या मुलाने विधानसभा लढवावी असा आग्रह झाला, मात्र ऐन वेळी दोघांनीही निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेने शोधून एक उमेदवार दिला. राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात जातीय समीकरणे आहेत.

अमूक जातीची एवढी मते तमूक जातीची तेवढी मते असा प्रकार आंबेगाव मतदारसंघात दिसत नाही. यावरून विचारले असता कोळसे-पाटील म्हणाले, माझी ही सातवी निवडणूक आहे. आजपर्यंत कधीही माझ्या मतदारसंघात जातीवरून मतदान झाले नाही. आम्ही आंबेडकर जयंती, ईद, दिवाळी अशा सण उत्सवात भेटतो; मिसळतो. एकमेकांचे सामाजिक कार्यक्रम करतो पण मतदारसंघात जातीवर कधीच मतदान झालेले नाही. शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले हे मूळ शिवसैनिक नाहीत असाही एक आक्षेप या मतदारसंघात आहे. ते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर कडवी टीका केली होती, तेच आता शिवसेनेचे उमेदवार आहेत. हा मुद्दादेखील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात चर्चेत आहे.

अनुसया महिला उन्नती केंद्र या माध्यमातून महिला कार्यकर्त्यांची तयार केलेली टीम आज आपल्या कामी येत आहे से सांगून वळसे पाटील म्हणाले, मतदार संघात महिला मेळावा आयोजित करायचे ठरवले तर छोट्या सूचनेवरही पंधरा ते वीस हजार महिला एकत्र जमू शकतात. ती आपली जमेची बाजू आहे. या महिला, अन्य महिलांसाठी शासकीय पातळीवरची छोटी मोठी कामे करून देण्यात पुढाकार घेतात. त्यामुळे यांच्याविषयी मतदारसंघात आदराची भावना आहे ती आज माझ्या प्रचारात मदतीला आली आहे. प्रचाराची रणधुमाळी नाही. कसली गडबड नाही. शांतपणे सकाळी उठायचे, प्रचाराला जायचे, मतदारसंघात भेटीगाठी घ्यायच्या, गावात कुठेतरी दुपारचे जेवण करायचे, पुन्हा भेटीगाठी करत संध्याकाळच्या वेळेला एखादी सभा घ्यायची असा शांत आणि निवांत प्रचार या मतदारसंघात पहायला मिळत आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Onion exports farmers to tears in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.