महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान; राज ठाकरेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 07:09 PM2019-11-12T19:09:48+5:302019-11-12T19:23:59+5:30
विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
मुंबई : भाजपा, शिवसेनेसह राष्ट्रवादीही सरकार स्थापनेस असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे.
राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. जे आज झालंय तो अपमान आहे. राज्यावर संकटे आहेत. यातच राज्यातील मतदात्यांचा घोर अपमान या नतद्रष्टांनी केला आहे, असे ट्वीट राज ठाकरे यांनी पोस्ट केले आहे.
#PresidentRuleInMaha राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे ह्या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) November 12, 2019
राज ठाकरे
विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
भाजपा, शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली होती. मात्र बहुमताचा आकडा नसल्यानं दोन्ही पक्षांना सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही. शिवसेनेनं बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला संधी दिली. मात्र त्यांनाही बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा गाठता आला नाही. त्यांनीदेखील शिवसेनेप्रमाणेच मुदत वाढवून देण्याची विनंती केली. मात्र राज्यपालांनी त्यास नकार दिला. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. आतापर्यंत राज्यात कधीही निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही.