Maharashtra Election 2019: 'राज ठाकरेंना नडतोय 'राजकीय आळशीपणा', पवारांसारखं फिरावं लागेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:46 PM2019-10-10T16:46:57+5:302019-10-10T16:52:52+5:30
दीपक पवार यांनी राज ठाकरेंच्या राजकारणाचे परखड विश्लेषण केले आहे
मुंबई - मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक दीपक पवार यांची राज ठाकरेंच्या अपयशाच विश्लेषण करतान राजकीय आळशीपणा हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सन 2006 मध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. या पक्षाकडून महाराष्ट्राला खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पहिल्याच सभेत मला शेतकऱ्याने जीन्स घातलेलं पाहायचंय, असे राज यांनी म्हटले होते. त्यानंतर, 2009 मध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेचे 13 आमदार निवडूण आले. पण, ते यश राज यांना टिकवता न आल्याचे पवार यांनी म्हटले. तसेच, राज ठाकरेंच्या एकतर्फी प्रेमातूनही त्यांना फटका बसल्याचं प्राध्यापक पवार यांनी म्हटलं.
दीपक पवार यांनी राज ठाकरेंच्या राजकारणाचे परखड विश्लेषण केले आहे. राज यांनी शरद पवारांचा आदर्श ठेवून परीश्रम करण्याची गरज असल्याचे सांगतानाच मराठीच्या विकासासाठी राज यांनी काय केले, किती कष्ट घेतले आणि त्यांच्या आमदारांनी 2014 पूर्वी विधानसभेत किती प्रश्न मराठीसंदर्भात उपस्थित केले? असा प्रश्नही शोधण्याची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले. शरद पवारांसारखा माणूस वयाच्या 89 व्या वर्षी एका दिवसात 3 ते 4 सभा घेतो. पण, वयाच्या 50 मध्ये असलेले राज ठाकरे हे निवडणूक काळात केवळ 10-12 सभांचं नियोजन करतात. राज यांचं हे काम म्हणजे राजकीय आळशीपणाचं उदाहरण आहे. राज ठाकरेंना शरद पवारांनीच यापूर्वी टोमणा मारला होता. राजकारण करायचं झालं तर लवकर उठावं लागतं आणि उशिरापर्यंत जागावं लागतं, याचीही आठवण पवार यांनी करुन दिली.
शरद पवार हे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रचारसभा आणि निवडणूक प्रचारांमध्ये गुंतला असेल, तर तुलनेनं तरुण पिढीतल्या राज ठाकरेंनी अजून कष्ट केले पाहिजेत, असेही पवार यांनी म्हटलं.