Maharashtra election: नितेश राणेंच्या उमेदवारीआधीच भाजपामध्ये बंडखोरी; अपक्ष अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 12:41 IST2019-10-03T12:25:20+5:302019-10-03T12:41:35+5:30
कणकवली भाजपाच्या कार्यकर्त्यांची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra election: नितेश राणेंच्या उमेदवारीआधीच भाजपामध्ये बंडखोरी; अपक्ष अर्ज दाखल
मुंबई/कणकवली : काँग्रेसचे माजी आमदार नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश करण्याआधीच भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. कणकवली-देवगड मतदारसंघातून कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
कणकवली भाजपाच्या कार्यकर्त्यांची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी स्वाभिमानचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. भाजप कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार दाखल झाले असून नितेश राणेही लवकरच येणार आहेत. ते भाजपामध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. देवगड-कणकवली मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर उमेदवारी मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये जठार नितेश राणे यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा करतील. तसेच भाजपा प्रवेशाचा अर्जही भरून घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
नितेश राणेंच्या विरोधात बंडखोरी करण्यात आली असून माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर नितेश राणे यांच्यावर आरोप करून स्वाभिमान पक्ष सोडणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंतही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सावंत यांना शिवसेना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे