बलाढ्य सत्ताधाऱ्यांशी एकाकी झुंजणारा लढवय्या स्ट्राँगमॅन!
By बाळकृष्ण परब | Published: October 19, 2019 07:03 PM2019-10-19T19:03:36+5:302019-10-19T19:20:47+5:30
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शुक्रवारी रात्री शरद पवार यांचे एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर झाले आणि सगळीकडेच त्या छायाचित्राची चर्चा सुरू झाली.
- बाळकृष्ण परब
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शुक्रवारी रात्री एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर झाले आणि सगळीकडेच त्या छायाचित्राची चर्चा सुरू झाली. हे छायचित्र होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच नव्हेत तर विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजकारणी, पत्रकार आणि ज्यांचा राजकारणाशी केवळ मतदानापुरता संबंध येतो असे लाखो सर्वसामान्य आणि एरवी शरद पवारांची निंदानालस्ती करणारे या सर्वांकडून हे छायाचित्र उत्स्फूर्तपणे शेअर होत होते. इतकी काय जादू होती या छायाचित्रात? तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढवय्या वृत्ती दाखवून परिस्थितीचा सामना कसा करावा, हे हे छायाचित्र सांगत होते.
सगेसोयरे, साथीदार सोडून गेले असताना, निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या विजयापेक्षा पराभवाचेच भाकित केले जात असताना एक ऐंशी वर्षांची चिरतरुण व्यक्ती शरीरातील असंख्य दुखणी सहन करून विरोधकांना आव्हान देतोय. न थकता पायाला भिंगरी लावल्यासारखा अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतोय. भर पावसात प्रकृतीची तमा न बाळगता सभा घेतोय, ही बाब सर्वसामान्यांना भावली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पराभवाची चाहूल लागल्यावर शस्रे म्यान करून पांढरे निशाण फडकवणारे अनेक जण दिसून आले. पण सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना शरद पवार यांनी जो झुंजार बाणा दाखवला त्याला तोड नाही.
कालच्या सभेतच नव्हे तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी मोदी-फडणवीसांसमोर हतबल झालेल्या विरोधी पक्षाच्या नेतृत्वाची धुरा एकट्याने वाहिली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील बिथरलेल्या नेत्यांची पळापळ होऊन ते भाजपा आणि शिवसेनेच्या आश्रयाला जाऊ लागले होते. या काळात पद्मसिंह पाटील, भास्कर जाधव गणेश नाईक, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक अनेक नेत्यांनी घड्याळाची साथ सोडली. त्यामुळे आता विधानसभा निवडणुक राष्ट्रवादीसाठी काही सोपी नाही, अशीही चर्चा झाली. त्यातच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने शरद पवारांच्या अडचणी वाढणार अशीच शक्यता वर्तवली जात होती.
पण शरद पवार यांनी थेट ईडीच्या कार्यालयात स्वत:हून उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच वातावरणात रंगत आली. एकहाती विजय मिळवू म्हणणाऱ्या भाजपा आणि शिवसेना महायुतीसमोर तगडा प्रतिस्पर्धी उभा राहिला. एकीकडे राष्ट्रवादीचा आघाडीतील साथीदार असलेल्या काँग्रेसने निवडणुकीआधीच शस्त्रे टाकल्यासारखे चित्र दिसत होते. तर एकेकाळी एकहाती सत्ता मागणारे राज ठाकरेही विरोधी पक्षात बसण्याची संधी द्या, असे आवाहन करू लागले होते. शरद पवार यांनी मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ले सुरू केले. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवार यांच्यात राजकीय कुस्तीवरून रंगलेली जुगलबंदी तर यंदाच्या प्रचाराचे खास आकर्षण ठरले.
एकंदरीत सत्ताधाऱ्यांविरोधात केलेल्या धडाकेबाज प्रचारामुळे प्रचाराच्या अखेरीस यांदाची विधानसभा निवडणूक शरद पवार विरुद्ध महायुतीचे बडे नेते अशीच झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. आता सत्ताधाऱ्यांविरोधात शरद पवारांनी उघडलेल्या आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला कितपत फायदा होतो, हे येत्या काळात दिसून येईलच. मात्र तूर्तास तरी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मराठा स्ट्राँगमॅन म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांनी जी लढवय्या वृत्ती दाखवली तिची आठवण प्रत्येक निवडणुकीवेळी येत राहील.