महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्ता स्थापनेबद्दल शरद पवारांचा शिवसेना, भाजपाला 'मोलाचा' सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 03:59 PM2019-11-08T15:59:34+5:302019-11-08T16:01:05+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले शरद पवारांच्या भेटीला
मुंबई: सत्ता स्थापनेचा तिढा दोन आठवड्यांनंतरही सुटत नसल्यानं राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली कोंडी सोडवण्याबद्दलचा सल्ला घेण्यासाठी पवारांची भेट घेतल्याचं आठवलेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
रामदास आठवले आज दुपारी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'सरकार स्थापन न झाल्यानं आणि तसा दावादेखील कोणत्याच पक्षानं न केल्यामुळे राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती दुरुस्त व्हायला हवी. राज्याच्या जनतेनं महायुतीला अगदी स्पष्ट कौल दिला आहे. मात्र दोन आठवड्यांनंतरही सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्यानं आठवले माझ्या भेटीसाठी आले. शिवसेना, भाजपामध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी त्यांना माझा सल्ला हवा होता,' असं पवार यांनी सांगितलं.
रामदास आठवले महायुतीचा भाग आहेत. म्हणून त्यांना महायुतीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल चिंता वाटते, असं पवारांनी सांगितलं. सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी शिवसेना, भाजपाला काय सल्ला द्याल, असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना विचारला. त्यावर महायुतीला जनतेनं स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी आता फार वेळ न घेता सरकार स्थापन करावं. ते राज्याच्या हिताचं असेल, असं उत्तर पवारांनी दिलं. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना, भाजपामध्ये नेमका काय फॉर्म्युला ठरला, त्याची कल्पना नसल्यानं त्यावर भाष्य करणार नसल्याचं पवार म्हणाले.