Maharashtra Election 2019: युती असली तरी शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांकडून अपक्ष उमेदवारांचा प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 04:12 PM2019-10-11T16:12:02+5:302019-10-11T16:12:50+5:30
कल्याण विधानसभा निवडणूक 2019 - कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघात या शिवसेना-भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांमधील दरी पाहायला मिळत आहे.
कल्याण - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला राज्यात वेग पकडला असून भाजपा-शिवसेना या दोन्ही पक्षात नेत्यांची युती झाली तरीही कार्यकर्त्यांची मानसिकता युतीच्या विरोधातील आहे. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघात या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील दरी पाहायला मिळत आहे. युती झाल्याने कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेला सोडण्यात आली. त्यामुळे विद्यमान भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.
तर दुसरीकडे कल्याण पूर्व मतदारसंघ भाजपाच्या कोट्यात गेलेला असताना याठिकाणी गणपत गायकवाड यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. गेली 2 टर्म गणपत गायकवाड हे या मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून येत आहेत. तर यंदाच्या निवडणुकीत गणपत गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या दोन्ही जागा युती झाल्यावर शिवसेनेला सोडण्यात याव्यात अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी केली होती. मात्र दोन पैकी एक जागा भाजपाकडून सोडण्यात आली. कल्याण पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेने ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी दिली आहे.
कल्याण पश्चिम मतदारसंघात युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विश्वनाथ भोईर प्रचार करत असले तरी भाजपाचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते अपक्ष उमेदवार म्हणून नरेंद्र पवार यांचाच प्रचार करत असल्याचं दिसून येतं. यामध्ये महापालिकेचे भाजपाचे नगरसेवक आणि उपमहापौर यादेखील नरेंद्र पवार यांचा प्रचार करताना पाहायला मिळतात. इतकचं काय तर नरेंद्र पवार यांच्या प्रचाराच्या बॅनरवर दिवंगत भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचा फोटो झळकतो. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील शिवसैनिक नाराज असल्याचं कळतंय.
कल्याण पूर्व मतदारसंघाची स्थितीही युतीसाठी अनुकूल नसल्याचं दिसून येतं. याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. बोडारे यांच्या उमेदवारी मागे शिवसेना नगरसेवकांची मोठी फळी उभी झाल्याचं दिसून येतं. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून गणपत गायकवाड प्रचार करत असले तरी शिवसैनिक पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून धनंजय बोडारे यांच्यासोबत शिवसेना नगरसेवक प्रचार करताना दिसतात. त्यामुळे राज्यस्तरावर महायुती झाली तरी स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपा कार्यकर्ते अधिकृत उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहे.