Maharashtra Election 2019: महायुतीमधील जागावाटपावर उद्धव ठाकरेंचं सूचक भाष्य; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:41 PM2019-10-05T15:41:20+5:302019-10-05T15:41:45+5:30
भाजपानं मित्रपक्षांना दिलेल्या वागणुकीवर उद्धव ठाकरेंचा प्रतिक्रिया
मुंबई: महायुतीमधील जागावाटपाचं गुऱ्हाळ बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं. शिवसेनेनं निम्म्या जागांचा आग्रह धरला होता. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाकडून शिवसेनेला तसा शब्ददेखील देण्यात आला होता. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी भाजपानं शब्द फिरवला. याशिवाय महायुतीमधील अन्य लहान मित्रपक्षांच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे. त्यामुळे त्या पक्षांचं अस्तित्वच धोक्यात येणार आहे. भाजपानं मित्रपक्षांना दिलेल्या वागणुकीवर उद्धव ठाकरे अतिशय सूचक भाष्य केलं.
आम्ही मित्रपक्षांसाठी जागा सोडलेल्या आहेत. आता त्यांना काय जागा दाखवायची, ते भाजपानं ठरवावं, असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी केलं. भाजपानं महायुतीमधील लहान मित्रपक्षांना १८ जागा सोडल्या आहेत. मात्र त्या सर्व जागा त्यांनी भाजपाच्या चिन्हावर लढवाव्यात अशी अट घालण्यात आली आहे. मित्रपक्षांना काय जागा दाखवायची, ते भाजपानं ठरवावं, असं उद्धव यांनी म्हटलं. मित्रपक्षांना जागा दाखवावी म्हणजे त्यांना कोणकोणत्या जागा द्यायच्या आहेत ते पाहावं, असं लगेचच ते पुढे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंना आरेतील वृक्षतोडीबद्दलदेखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या विषयाचा अभ्यास करुन माहिती घेऊन योग्य वेळी बोलू, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं. आरेचा विषय सोडणार नाही. झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं ते लवकरच ठरवू. त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन रोखठोक बोलू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरेचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. उद्धव यांनी आज धनगर, कुणबी, तेली, वंजारी समाजाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.