Maharashtra Election 2019: 'एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 06:09 PM2019-10-16T18:09:41+5:302019-10-16T18:11:32+5:30
नारायण राणेंनी काल त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केला
सिंधुदुर्ग: एका कुटुंबाचा स्वाभिमान काल कणकवलीत गळून पडला, अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंनी यांनी खासदार नारायण राणेंवर केली. बाळासाहेबांना, काँग्रेसला आणि स्वत:च्या कार्यकर्त्यांना फसवणारे भाजपाला काय देणार, अशा शब्दांत देसाईंनी अप्रत्यक्षपणे राणेंना लक्ष्य केलं. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
काल नारायण राणेंनी त्यांच्या दोन्ही मुलांसोबत भाजपात प्रवेश केला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करत असल्याची घोषणा त्यावेळी राणेंनी केली. त्यावर भाष्य करताना एका कुटुंबाचा 'स्वाभिमान' काल कणकवलीत गळून पडला, असं भाष्य शिवसेना नेते सुभाष देसाईंनी केलं. यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांच्या विधानाचा संदर्भ दिला. नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागितल्यास शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद निश्चितपणे संपेल, असं केसरकर काल म्हणाले होते. त्यावर माफी मागायची असेल तर निवडणुकीतून माघार घ्या आणि शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना पाठिंबा द्या, असं देसाई म्हणाले.
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नारायण राणेंचा समाचार घेतला. 'मातीच्या ढिगाऱ्यावरील ही ऐतिहासिक सभा आहे. येत्या २४ तारखेनंतर या ठिकाणी कोणाला तरी गाडायचं आहे. शिवसेना औषधाला राहणार नाही असं म्हणणारे आज सेनेशी जुळवून घ्यायला बघतात, हा काळाचा महिमा आहे. येवल्यापासून कणकवलीपर्यंत शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांची आज अवस्था पहा,' अशा शब्दांत राऊत यांनी राणे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनादेखील लक्ष्य केलं.