महाराष्ट्र निवडणूक 2019: पुन्हा टीकेला 'ऊत'; सकाळ होताच भाजपावर बरसले संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 09:29 AM2019-11-07T09:29:32+5:302019-11-07T09:38:45+5:30
Maharashtra Election 2019 संजय राऊत यांचा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा
Next
मुंबई: विधानसभेचा निकाल जाहीर होऊन जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्याप राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. आज शिवसेना, भाजपाच्या गोटात मोठ्या घडामोडी होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांची बैठक घेणार आहेत. तर भाजपाचे नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 7, 2019
कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं
दुष्यंत कुमार
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत सतत भाजपाला लक्ष्य करत आहेत. सोशल मीडिया, सामनातील अग्रलेख, पत्रकार परिषदा यांच्या माध्यमातून राऊत यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. आज त्यांनी कवी दुष्यंत कुमार यांचा एक शेर ट्विट केला आहे. 'तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं,' असा शेर राऊत यांनी ट्विट केला आहे. यामधून त्यांनी भाजपाला लक्ष्य केल्याची चर्चा आहे.
काल सकाळीदेखील संजय राऊत यांनी एका ट्विटमधून भाजपावर निशाणा साधला होता. 'जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है,' असं ट्विट राऊत यांनी केलं होतं. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, अशी ठाम भूमिका राऊत यांनी घेतली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ते सतत भाजपावर तोफ डागत आहेत. संजय राऊत यांच्या टीकेमुळेच शिवसेना, भाजपामधील दरी वाढल्याचं भाजपाच्या काही नेत्यांनी म्हटलं होतं.
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्ष आज संपण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. भाजपानं दिलेल्या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय होऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी आमदारांची बैठक होईल. या बैठकीत राज्यामध्ये सध्या निर्माण झालेला सत्तावाटपाचा तिढा, भाजपासोबत वाटाघाटी करण्याबाबत आमदारांची भूमिका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्यास त्याचे स्थानिक राजकारणावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम, भाजपाबाबत शिवसेना आमदारांची असलेली मतं याबाबत चर्चा होणार आहे.