'हीच ती वेळ' म्हणणाऱ्या शिवसेनेची नवी टॅगलाईन ठरली; भाजपाची डोकेदुखी वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 06:57 PM2019-11-02T18:57:10+5:302019-11-02T19:08:30+5:30

हातात हात घालून निवडणूक लढवणारे भाजपा आणि शिवसेना हे भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत.

Maharashtra Election 2019: Shiv Sena new tagline to pressurise BJP is Now or Never | 'हीच ती वेळ' म्हणणाऱ्या शिवसेनेची नवी टॅगलाईन ठरली; भाजपाची डोकेदुखी वाढली!

'हीच ती वेळ' म्हणणाऱ्या शिवसेनेची नवी टॅगलाईन ठरली; भाजपाची डोकेदुखी वाढली!

Next
ठळक मुद्देशिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, आपण मागे हटणार नसल्याचं ठणकावून सांगितलंय.भाजपाने त्यांचं पत्र घेऊन यावं, जे ठरलं होतं, ते मान्य करावं, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली.यावेळी कोणत्याही पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला.

मुंबईः विधानसभा निवडणूक निकालाला आठवडा उलटून गेल्यानंतरही राज्यात सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरायला तयार नाही. हातात हात घालून निवडणूक लढवणारे भाजपा आणि शिवसेना हे भाऊ मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेत. एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न दोन्हीकडून सुरू आहे. राजकीय वर्तुळात वेगवेगळी गणितं जुळवली जात आहेत. अशातच, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी, आपण मागे हटणार नसल्याचं ठणकावून सांगितलंय. आत्तापर्यंत 'हीच ती वेळ', असं म्हणणारी शिवसेना आता आणखी पुढे जाऊन, 'आत्ता नाही तर कधीच नाही', अशा पवित्र्यात असल्याचं राऊत यांनी 'एबीपी माझा'वरील कार्यक्रमात स्पष्ट केलं. आम्ही शांतपणे बसलोय, सरकार कधी स्थापन होतं याची वाट बघतोय, आमच्याकडे जनादेश नाही, सर्वात मोठा पक्ष म्हणून ती भाजपाची जबाबदारी आहे, अशी भूमिका घेत त्यांनी भाजपावर दबाव आणखी वाढवलाय.

...तर मग उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायचा विचार करावा; आठवलेंनी सुचवले

'मुख्यमंत्र्यांच्या वाक्याने राग येतो; मग भाजपाबद्दल वाईट अग्रलेख लिहिलेत त्याचं काय?'

शिवसेना युतीधर्माचं पालन करत आहे. आमच्या ६३ लोकांच्या पाठिंब्याची गरज असेल तर तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे. पाठिंब्याचं पत्र द्यायलाही आम्ही तयार आहोत, असं सांगतानाच, भाजपाने त्यांचं पत्र घेऊन यावं, जे ठरलं होतं, ते मान्य करावं, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली. एरवी निकालानंतर लगेच भाजपा सत्तास्थापनेचा दावा करते. हरयाणातही त्यांनी ७२ तासांत सगळं जुळवलं. मग इथेही त्यांनी सरकार स्थापनेसाठी पुढे यायला हवं, असं त्यांनी डिवचलं. त्याचवेळी, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊन यावेळी कोणत्याही पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. 

'फिफ्टी-फिफ्टी'साठी अडून बसलेल्या शिवसेनेला छगन भुजबळांचा मोलाचा सल्ला!

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  यांनी ठरवलं आहे. भाजपाच्या हायकमांडने तसा शब्दही दिला होता. तो त्यांच्याकडून पूर्ण होत नसेल तर आम्ही कोणत्याही संघर्षाला तयार आहोत, पण मुख्यमंत्री करणारच, असं खासदार राऊत यांनी ठामपणे सांगितलं. मात्र, मुख्यमंत्री कोण असेल आणि तो कुणाच्या पाठिंब्यावर बसेल, यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं. तरुणांनी नेतृत्व करायला हवं, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य यांनाच पसंती दर्शवली आहे.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांना गुरू मानतात. मग, मी त्यांना भेटलो, आघाडीचं सरकार कसं चालतं याबद्दल त्यांचा सल्ला घेतला तर कुठे बिघडलं?, असा सूचक प्रश्न त्यांनी केला. 

'आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपने बहुमत सिद्ध करावेच'

भाजपच्या आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबई न सोडण्याचे आदेश

मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षं वाटून घेण्याबाबत काहीही ठरलेलं नव्हतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे उद्धव ठाकरे खोटं बोलताहेत असा संदेश जातोय आणि ते चुकीचं आहे. त्यामुळेच त्या विधानाने दुःख झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेने भाजपापुढे कधीच माघार घेतलेली नाही. युतीचा प्रस्ताव घेऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते. देशहिताच्या मुद्द्यावर त्यांनी मदतीचा हात मागितल्यानं, मनात शंकेची पाल चुकचुकत असतानाही त्यांना एक संधी देण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं स्पष्ट करत राऊत यांनी भाजपावर शरसंधान केलं.

Web Title: Maharashtra Election 2019: Shiv Sena new tagline to pressurise BJP is Now or Never

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.