महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाबाहेर फोडले फटाके; तणाव वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 11:01 PM2019-11-11T23:01:15+5:302019-11-11T23:02:03+5:30
तणाव वाढल्यानं भाजपा कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त
नाशिक: शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाबाहेर फटाके फोडल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला. यानंतर भाजपा कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी फटाके वाजवून पळ काढला. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. सध्या भाजपा कार्यालयाबाहेर भद्रकाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी तैनात आहेत.
शिवसेना, भाजपामधील संघर्ष अतिशय विकोपाला गेला आहे. सत्तापदांचं समान वाटप करा, असा आग्रह करत शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीवेळी देण्यात आलेला शब्द पाळा, असं आवाहन शिवसेनेकडून करण्यात आलं. मात्र मुख्यमंत्रिपदाबद्दल कोणताही शब्द देण्यात आला नव्हता, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यामुळे शिवसेना, भाजपामधील संघर्ष वाढला.
गेल्या शुक्रवारी (८ नोव्हेंबरला) देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबद्दल कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला. आमचे फोन उचलायला उद्धव यांच्याकडे वेळ नाही. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीशी दिवसातनू तीन-तीन वेळा चर्चा करायला वेळ आहे, अशा शब्दांत फडणवीस उद्धव यांच्यावर बरसले. यानंतर थोड्याच वेळात उद्धव यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्रिपदाबद्दल मी खोटं बोलत नाही. बाळासाहेबांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारच, असं उद्धव म्हणाले होते. यानंतर आज शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचं पत्र न मिळाल्यानं शिवसेनेला अपयश आलं.