Maharashtra Election 2019: 'सत्तेत राहून विरोध करणं हा शिवसेनेचा नवा पॅटर्न; त्याचं स्वागत व्हायला हवं'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 09:45 AM2019-10-15T09:45:51+5:302019-10-15T09:46:35+5:30
अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तेव्हा शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. सरकारमध्ये आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार नाही असं त्यांनी सांगितले.
मुंबई - सगळ्या पक्षांशी बांधिलकी जनतेशी आहे. सत्तेत राहून विरोध करणे हा शिवसेनेचा नवीन पॅटर्न आहे. याचं स्वागत व्हायला हवं. पूर्वी तसं होत असे सरकारने सरकारचं काम करायचं आणि विरोधकांनी विरोधाचं काम करायचं. आमची भूमिका भाजपाला मान्य आहे म्हणून भाजपाने शिवसेनेसोबत युती केली असं मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी मांडले आहे.
एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना सुभाष देसाई म्हणाले की,महाराष्ट्राच्या राजकारणात दोनच राजकीय पक्ष भाजपा-शिवसेना आहेत. बाकी कुठेही दिसत नाही. आम्ही सरकारवर टीका केली नाही तर जनतेच्या बाजूने राहिलो आहे. अनेक आंदोलनात शिवसेना सहभागी झाली. अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तेव्हा शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली. सरकारमध्ये आहे म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच राणे प्रवृत्तीला शिवसेनेचा विरोध आहे. कणकवलीची जागा भाजपाची आहे, भाजपाचा कोणीही उमेदवार दिला असता तरी विरोध केला नसता. मात्र राणे ही प्रवृत्ती आहे तिला शिवसेनेचा कायम विरोध राहणार आहे. आदित्य ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करायला ते निवडून आले पाहिजेत. कणकवलीत शिवसेना विजयी होणार आहे. राणेंच्या विरोधात आम्ही उमेदवार दिला आहे. शिवसेनेच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. हा वाद भाजपाशी नाही तर राणे प्रवृत्तीशी आहे अशी भूमिका सुभाष देसाईंनी मांडली.
दरम्यान, आरेचा विषय वचननाम्यात नाही कारण हा विषय पुढे गेलेला आहे. आरे जंगल घोषित करणार हे आदित्य ठाकरेंनी घोषित केलं आहे. आरेच्या बाजूने आम्ही मनापासून आहोत. रात्रीच्या अंधारात वृक्षतोड केली गेली. सुप्रीम कोर्टात निर्णय असल्याने निर्णयाची वाट बघावी लागेल. जेव्हा न्यायहक्काचे प्रश्न आहे, जनतेचे प्रश्न चिरडले जाईल तेव्हा शिवसेना जनतेसोबत राहील. आम्ही कधीही विरोधाला विरोध केला नाही म्हणून सरकार स्थिर राहिलं. आज जी विकासकामे झाली त्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे असंही सुभाष देसाईंनी सांगितले.