मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार, आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 03:06 PM2019-11-10T15:06:41+5:302019-11-10T15:07:32+5:30
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झालेला आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झालेला आहे. त्यातच राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत सरकार स्थापन करणरा असेही संकेत मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालाड येथील हॉटेल रिट्रीट येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांना संबोधित केले. यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार असल्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच भाजपाशी असलेली युती अद्याप तुटली नसल्याचे सांगत त्यांनी युतीमधील तणाव निवळण्याची अंधुकशी आशा कायम असल्याचे संकेत दिले आहेत.
मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये पक्षाच्या आमदारांना संबोधित करताना काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार असल्याचे विधान केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. तसेच भाजपाशी असलेली युती अद्याप तोडलेली नसल्याचे ठाकरे यांनी म्हटल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या बैठकीकडे भाजपाचेही लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, महाजन उपस्थित होते. या बैठकीत राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जोरदार खलबते झाली. दुपारी चार वाजता भाजपाची पुन्हा एकदा बैठक होणार असून, सत्तास्थापनेबाबत या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ''माननीय राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेसाठी भाजपाला निमंत्रित केले आहे. या निमंत्रणाबाबत पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. आता संध्याकाळी चार वाजता आम्ही पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. त्यानंतर सरकार स्थापन करणार की नाही याबाबतचा अंतिम निर्णय आम्ही राज्यपालांना कळवणार आहोत,''