Maharashtra Election 2019: ...तेव्हा लोकांना समसमान वाटपाचा अर्थ कळेल; उद्धव यांचा भाजपावर 'राम'बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 09:46 AM2019-10-07T09:46:06+5:302019-10-07T09:47:47+5:30
राम मंदिराचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपाला 'त्या' वचनाची आठवण करुन दिली
मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले होते. त्यावेळी दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत निम्म्या निम्म्या जागा लढतील, असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२४ जागा लढवणार आहे. त्यामुळे युतीतला मोठा भाऊ कोण हे स्पष्ट झालं आहे. यावर भाष्य करताना मंत्रिमंडळ स्थापन होईल, तेव्हा लोकांना समसमान वाटप म्हणजे काय ते कळेल, असं सूचक विधान उद्धव यांनी केलं.
Maharashtra Election 2019: ...तोपर्यंत राजकारण सोडणार नाही; उद्धव ठाकरेंची प्रतिज्ञा
फिफ्टी फिफ्टीचा करार मोडला असं तुम्हाला वाटत का, असा प्रश्न उद्धव यांना सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुलाखतीत विचारला. त्यावेळी उद्धव यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला. 'आम्ही जागावाटपात समजूतदारपणा दाखवला. अमित शहांसोबत हॉटेल ब्ल्यू सीच्या पत्रकार परिषदेत जबाबदारी आणि अधिकार यांचं समसमान वाटप हा अतिशय महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे २४ तारखेला विधानसभेचे निकाल लागतील. त्यानंतरच्या पुढच्या आठ-दहा दिवसात मंत्रिमंडळ स्थापन होईल. तेव्हा समसमान वाटप म्हणजे काय हे लोकांना कळेल,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Maharashtra Election 2019: उद्धव ठाकरे म्हणतात, 124 जागांवर समाधान मानणे ही तडजोड नाहीच, तर...
लोकसभेवेळी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला देणाऱ्या भाजपानं शब्द पाळला नाही, अशी शिवसैनिकांची भावना आहे. त्यावर बोलताना उद्धव यांनी भाजपाला रामाची आठवण करुन दिली. 'मंत्रीमंडळ स्थापनेवेळी जबाबदारी आणि अधिकारांचं समसमान वाटप होईल यावर माझा विश्वास आहे. कारण शेवटी अयोध्येत राममंदिर आम्हाला कशाला पाहिजे? रामाचंच मंदिर का पाहिजे? राम हा सत्यवचनी होता. एकवचनी होता. वचन पाळण्याची आपली नीती किंवा वृत्ती नसेल तर राममंदिर पोकळ आहे. मग ती एक वल्गना आहे. त्यामुळे आम्ही रामभक्त आहोत. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. दिलेला शब्द पाळणारे आम्ही रामाचे भक्त आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे,' अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला दिलेल्या वचनाची आठवण करुन दिली.