Maharashtra Election 2019 ३० टक्के नोकरदारांना सरकार लवकरच नारळ देणार; राज ठाकरेंचा मोठा बॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 09:21 PM2019-10-12T21:21:00+5:302019-10-12T21:25:51+5:30
आर्थिक मंदी, बेरोजगार, शेतकरी आत्महत्यांवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल
भिवंडी: देशातील आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. आधी खासगी उद्योगांपर्यंत असलेलं संकट आता सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलं आहे, अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंनीभाजपा सरकारला लक्ष्य केलं. राज्य सरकार ३० टक्के कर्मचाऱ्यांना लवकरच नारळ देणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता सरकारी नोकऱ्यादेखील सुरक्षित नाहीत हे स्पष्ट आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी त्यांच्या भिवंडीतील सभेत आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पीएमसी बँकेवरील संकटांवरुन सरकारवर तोफ डागली. खासगी नोकऱ्यांपाठोपाठ आता सरकारी नोकऱ्यादेखील जाणार आहेत. २०१४ मध्ये भाजपा विचारत होती, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आता आम्ही त्यांना विचारतो, अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गेल्या ५ वर्षांमध्ये १४००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र आपल्याला काहीच वाटत नाही. कारण आपण संवेदनाशून्य झालो आहोत, असं राज यांनी म्हटलं.
तुम्ही तुमचा राग, संताप व्यक्त करत नाही. त्यामुळेच सत्ताधारी तुम्हाला गृहीत धरतात. त्यामुळेच तुमचा संताप मतदानातून व्यक्त करा, असं आवाहन राज यांनी केलं. राज्यातील जनतेला कशाचंच काही वाटत नाही. त्यामुळेच सत्ताधारी बेलगाम झाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याला सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. येत्या काळात जबाबदार विरोधी पक्षाची जबाबदारी मनसे समर्थपणे पाडेल, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भिवंडी शहरातील प्रमुख समस्यांवर भाष्य केलं. भिवंडीतल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. तुम्ही या भागात राहतातच कसे? तुम्हाला या परिस्थितीचा राग येत नाही का?, असे प्रश्न राज यांनी उपस्थितांना विचारले.
नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना रस्ते खड्डेमुक्त होते. उत्तम काम करायचं ठरवल्यास ते होऊ शकतं. पण रस्त्यांच्या कंत्राटांमधून टक्के हवे असतील, तर मग रस्त्यांची कामं व्यवस्थित कशी काय होणार, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गुजरातमधली टोरंट कंपनी भिवंडीत अव्वाच्या सव्वा बिल आकारते. मात्र लोकांना त्याबद्दल काहीच वाटत नाही. माझ्या भाषणाला ज्या टाळ्या वाजताहेत, तशीच एखादी टाळी टोरंट कंपनीच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या गालावर वाजवली असती, तर परिस्थिती बदलली असती, असं राज ठाकरे म्हणाले.