Maharashtra Election 2019: कसंही बघितला तरी गडी पैलवान दिसत नाही; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:07 AM2019-10-13T10:07:51+5:302019-10-13T10:09:46+5:30
महाराष्ट्राचं वातावरण फिरलंय, आता एकच लाट शरद पवार, हे महाराष्ट्रातील तरुण, शेतकरी, महिलांनी हे ठरवलं आहे
अहमदनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, अंगाला तेल लावून बसलोय, समोर पैलवान नाही, पुढून,मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही. जर समोर पैलवान नसतील देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याठिकाणी आखाडा खणायला येतायेत का? लहानपणी आमच्यावर संस्कार होते. जर मुलगा परिक्षेत नापास झालं तर बापाला घेऊन यावं लागतं, आता ते तुम्ही समजा काय झालं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
अहमदनगर येथे राष्ट्रवादी उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी ते बोलत होते. यावेळी कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्राचं वातावरण फिरलंय, आता एकच लाट शरद पवार, हे महाराष्ट्रातील तरुण, शेतकरी, महिलांनी हे ठरवलं आहे. भाजपा-शिवसेना एक अजगर आहे, सर्व प्राण्यांना गिळंकृत करत चाललेला, एकदा फुस्स करायचं तर चौकशी, मोठा प्राणी दिसला की परत फुस्स सीबीआय अन् त्याहून मोठा प्राणी सापडला तर ईडी अशाप्रकारे हा अजगर महाराष्ट्राला विळखा घालण्याचा तयारी करतोय. मात्र या अजगाराचा बिमोड करण्याचं काम शरद पवारच करणार आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? 3 सप्टेंबरला मंत्रिमंडळात निर्णय झाला गड-किल्ले भाडेतत्त्वार देण्यात येणार. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री मूग गिळून गप्प बसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाडेतत्वावर देताना शिवसेना मूग गिळून गप्प बसणार असतील तर त्याचं उत्तर शिवसेनेने महाराष्ट्राला दिलं आहे. मग सांगा तुम्हाला मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
तर येणारी विधानसभा निवडणूक ही उमेदवारांमधील लढाई नाही, पक्षांची लढाई नाही, तर दोन विचारांची लढाई आहे. शाहु-फुले आंबेडकर यांच्या विचारांची लढाई आहे. आपल्या मुलांना रोजगार मिळणार की नाही. त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवायचं की नाही हे ठरविणारी निवडणूक आहे असंही अमोल कोल्हे म्हणाले.