'मुख्यमंत्र्यांच्या वाक्याने राग येतो; मग भाजपाबद्दल वाईट अग्रलेख लिहिलेत त्याचं काय?'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:38 PM2019-11-02T13:38:35+5:302019-11-02T13:43:42+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: युतीतील विसंवादाचं खापर भाजपावर फोडणाऱ्या शिवसेनेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'रोखठोक' सवाल केला आहे.
मुंबईः विधानसभेची निवडणूक हातात हात घालून लढलेले भाजपा आणि शिवसेना हे भाऊ आता एकमेकांची तोंडं पाहायलाही तयार नाहीत. मुख्यमंत्रिपदावरून त्यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे निकाल लागून आठ दिवस उलटल्यावरही सरकारस्थापनेचा मुहूर्त ठरत नाहीए. युतीतील चर्चेला खीळ बसण्याचं कारण म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान शिवसेना पुढे करतेय. त्यावरून तीव्र नाराजी आणि राग व्यक्त केला जातोय. मात्र, युतीतील विसंवादाचं खापर भाजपावर फोडणाऱ्या शिवसेनेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'रोखठोक' सवाल केला आहे.
भाजपावर चिडलेल्या शिवसेनेला मुनगंटीवारांनी सांगितली भित्र्या सशाची गोष्ट
शिवसेना लवकरच अॅक्शन मोडमध्ये; खासदार संजय राऊत यांचे संकेत
भाजपासोबत सत्तेत असतानाही शिवसेना सातत्याने आमच्यावर टीका करत होती. या टीकेला आम्ही प्रेमानेच उत्तर देत आलो. त्यांनी सोडलेले शब्दबाण आम्ही धरून ठेवले असते, तर लोकसभेला युती होऊच शकली नसती. आज मुख्यमंत्र्यांच्या एका वाक्याने नाराज झाल्याचं शिवसेना म्हणते; मग भाजपाबद्दल इतके दिवस वाईट अग्रलेख लिहिले गेले त्याचं काय?, असा 'मार्मिक' प्रश्न मुनगंटीवार यांनी केला. शिवसेनेबाबत भाजपाने कायमच सौजन्याची आणि सामंजस्याची भूमिका घेतल्याचं सांगत त्यांनी काही घटनांकडे लक्ष वेधलं. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपाला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेला नंतर आम्हीच पाठिंबा दिला, मुंबई महापालिकेतही आम्ही कुठलीही अपेक्षा न करता, सत्तेत सहभागी न होता त्यांना साथ दिली, असं मुनगंटीवारांनी नमूद केलं. याच धर्तीवर, राज्यातही महायुतीच सत्ता स्थापन करेल, आम्ही चर्चेतून-संवादातून तोडगा काढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कधी संपेल शिवसेना, भाजपामधील सुंदोपसुंदी? शरद पवारांची मोठी भविष्यवाणी
सत्तासंघर्षात फडणवीस-ठाकरेंपेक्षा संजय राऊतांची अधिक चर्चा
शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचं काहीही ठरलेलं नाही, असं विधान मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केलं होतं. ते शिवसेनेला झोंबलं. त्यामुळे त्याच दिवशी संध्याकाळी होणारी चर्चा त्यांनी रद्द केली. त्यानंतर, आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, भाजपाने खुशाल सत्तास्थापनेचा दावा करावा, अशा डरकाळ्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत फोडत आहेत. मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं कुणी समजू नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. दुसरीकडे, शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदं द्यायची तयारी भाजपानं दाखवल्याचं कळतंय. पण, भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे.
शिवसेनेसोबत गेले पाहिजे; खा. हुसेन दलवाई यांचे सोनिया गांधींना पत्र
बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी प्रतारणा करू नका; रामदास आठवले यांचे वक्तव्य
वड्याचं तेल वांग्यावर!
दरम्यान, राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्या विधानावरूनही शिवसेना खवळलीय. राष्ट्रपती तुमच्या मुठीत आहेत का?, अशी धमकी देणं ही तर मोगलाई आहे, असे बाण त्यांनी सोडलेत. त्यावर, मी शिवसेनेला धमकी किंवा इशारा दिला नव्हता, फक्त तांत्रिक बाब सांगितली होती, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होते, यात चूक काय? शिवसेनेला वेगळाच कसला तरी राग आलाय आणि ते वड्याचं तेल वांग्यावर काढत आहेत, असा टोलाही त्यांनी मारला.