महाराष्ट्र निवडणूक 2019: तोडगा निघाला तरच शिवसेनेला पाठिंबा; जयंत पाटील यांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:25 AM2019-11-19T02:25:51+5:302019-11-19T06:24:39+5:30
शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत तोडगा निघाला तरच, सरकार स्थापनेच्या दिशेने दोन पावले पुढे पडतील
इस्लामपूर (जि. सांगली) : राजकारणात स्वप्न बघणे योग्य नाही. राजकारणात सर्व काही झाल्याशिवाय खरे मानायचे नाही. शिवसेनेला तत्त्वत: पाठिंबा देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या बैठकीत तोडगा निघाला तरच, सरकार स्थापनेच्या दिशेने दोन पावले पुढे पडतील, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटचा ५० वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम आमदार पाटील व त्यांच्या पत्नी शैलजा पाटील यांच्याहस्ते झाला. पाटील म्हणाले, येथील कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघता, आपले सरकार आल्याचा आनंद दिसतो आहे. मात्र सरकार नाही आले तरी दु:खी होण्याची गरज नाही. सक्षम विरोध करण्याएवढे संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे.
राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यश मिळण्यासाठी अजून ८ ते १० दिवसांचा कालावधी लागेल. मंगळवारी मला दिल्लीला जावे लागणार आहे. तेथे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा होईल. शेवटी राजकारणातील निर्णय वरिष्ठ स्तरावर होतात, ते स्वीकारावे लागतात, असे सांगत आ. पाटील यांनी सरकार स्थापनेचा ‘सस्पेन्स’ कायम ठेवला.
...तरच पूर्ण एफआरपी देणे होईल शक्य
एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांवर वाढणारा कर्जाचा बोजा धोकादायक आहे. एफआरपीसाठी कर्ज देण्याऐवजी केंद्र सरकारने साखरेला ३४ ते ३५ रुपयांचा दर दिला, तर बाजारातून पैसे मिळतील. त्यामुळे एफआरपीसाठी कर्ज काढावे लागणार नाही. यासाठी केंद्राकडे आग्रह धरला जाईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.