Maharashtra Election 2019: राज्यात धोबीपछाड देणारा एकच पैलवान उरला; भाजपाचा राष्ट्रवादीला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:27 AM2019-10-18T11:27:26+5:302019-10-18T11:31:08+5:30
सध्या निवडणुकीच्या प्रचारात पैलवान हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच भाजपा-राष्ट्रवादी एकमेकांवर कुरघोडी करण्यात दंग आहे. राज्यातील निवडणुकीच्या आखाड्यात पैलवान कोण यावरुन दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. तेल लावलेला पैलवान तयार आहे पण लढायला कोणी तयार नाही असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर दिलं होतं.
भाजपाने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर वार करण्यास जोरदार सुरुवात केली आहे. अनेकांना आपल्या शब्दातून घायळ करण्यासाठी भाजपाने रम्या नावचं काल्पनिक पात्र समोर आणलं आहे. हा रम्या विरोधकांचा समाचार घेत असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या निवडणुकीच्या प्रचारात पैलवान हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे. यावरुन रम्याने गेल्या ४७ वर्षात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. शिवाय त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे हे वेगळं सांगायला नको असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
रम्या म्हणतो, संपूर्ण महाराष्ट्रात धोबीपछाड देणारा आता एकच पैलवान उरला आहे!!#रम्याचेडोसpic.twitter.com/MMQA5N4Oga
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 18, 2019
तसेच गेल्या ५ वर्षात सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. पण विकासाची प्रक्रिया कुठेही थांबू न देता सगळ्या पैलवानांना देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याच आखाड्यात असा धोबीपछाड दिला की काहींची तोल गेलाय तर काही थकल्याभागल्याची भाषा करतायेत असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.
मतदानाचा दिवस जसा- जसा जवळ येतोय, तसा प्रचाराचा जोर वाढत असून आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. या आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणूक विधानसभेची असली तरी पैलवान आणि कुस्तीचा आखाडा चांगलाच गाजताना दिसत आहे. आम्ही नटरंग नाही, त्यामुळे हातवारे करत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना सांगितले होते. त्यानंतर आता बाळा तुझा पैलवान तयार आहे का? असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचलं होतं. तसेच पैलवान नाही म्हणता मग पंतप्रधानांपासून सगळेच केंद्रीय नेते महाराष्ट्रात कशाला आलेत असाही प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचारला होता. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात येत्या २४ तारखेला कोण बाजी मारणार हे निवडणुकीच्या निकालात कळेल.