Maharashtra Election 2019: राज्यात नक्कीच आश्चर्यकारक निकाल लागतील; शरद पवारांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 01:05 PM2019-10-19T13:05:44+5:302019-10-19T13:06:33+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मेगाभरती वैगेरे असं नव्हतं. तेव्हा विचारधारेने पक्ष चालत होता
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. यंदाच्या निवडणुकांचे निकाल आश्चर्यकारक असतील. लोकांचा प्रतिसाद पाहता हे घडू शकतं असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी माध्यमाशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, गेले काही वर्षात माझ्या पक्षात बऱ्याच घडामोडी घडल्या, सत्तेच्या काळात असणारे नेते सत्ता नसताना सोडून गेले, सत्तेशिवाय न राहण्याची स्थिती आल्यामुळे नेत्यांच्या मनात चलबिचल झाली. असे नेते सत्ताधारी पक्षात गेले. पक्षांतर केलेल्यांपैकी काही ५-१० नेते सोडले तर इतरांना संधी मिळाली नाही. या नेत्यांचा वापर करुन घेतला. एखादी व्यक्ती ४-५ आमदारांना निवडून आणणार असतील तर त्याला किंमत दिली जाते. नंतर हळूहळू त्यांना बाजूला सारुन दिलं जातं असं त्यांनी सांगितले.
तसेच अटलबिहारी वाजपेयींच्या काळात मेगाभरती वैगेरे असं नव्हतं. तेव्हा विचारधारेने पक्ष चालत होता, आज स्थिती तशी नाही, येतंय त्याला घ्या अशी स्थिती आहे. जे येत नसतील त्यांना सत्तेचा गैरवापर करुन पक्षात घेतलं जातं असा आरोप शरद पवारांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसने कलम ३७० ला विरोध केला नाही तर स्थानिक जनतेला, नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली. मात्र ती मागणी करण्याची भूमिका घेतली म्हणून डुब मरो असं पंतप्रधान बोलतात हे योग्य नाही, देशाच्या पंतप्रधनांना १० सभा घ्याव्या लागतात, गृहमंत्री अनेक जिल्ह्यात सभा घेत फिरतायेत मग विरोधक कसे दिसत नाहीत? असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
त्याचसोबत २०१४ च्या निवडणुकीत मी उभा होतो का? मी १४ वेळेला लोकसभा, राज्यसभा निवडणुका लढविल्यानंतर मी निर्णय घेतला निवडणुकीत उभं राहायचं नाही. तरुणांना संधी देण्याची भूमिका घ्यायला हवी. राज्य सहकारी बँकेतील कर्ज देण्यासाठी मी शिफारस पत्र लिहिले आहे, पत्र दिलं आहे. मग ते दाखवा असंही आवाहन शरद पवारांनी केलं आहे.
वीर सावरकरांना भारतरत्न देण्यात गैर नाही
वीर सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचाराला विरोध आहे मात्र त्यांनी विज्ञानवादी विचारांना चालना दिली. त्याबद्दल त्यांना भारतरत्न देणं काय गैर वाटत नाही. त्यांनी विज्ञानवादी विचार लोकांमध्ये मांडले. वीर सावरकरांचे नेतृत्व भाजपाने कधी मानलं नव्हते. जनसंघ असो वा भाजपा स्थापनेपासून इतिहास आठवलो, तर सावरकरांच्या हिंदू महासभेला जनसंघाचा पाठिंबा नव्हता. आज ते भूमिका मांडत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी ज्याचा ज्याचा वापर करता येईल ते सगळं भाजपा करत आहे.